Uddhav Thackeray On BMC Election : 'विधानसभेची चूक पुन्हा नको!'; मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना सल्ला
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. "विधानसभेतील चूक पुन्हा होऊ देऊ नका!", असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी त्यांनी सर्व शाखा आणि विभाग प्रमुखांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी शिवसेना भवन, दादर येथे 227 शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुखांसोबत दोन सत्रांत बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "महापालिकेवर भगवा पुन्हा फडकवणे ही आता फक्त जबाबदारी नाही, तर पक्षाच्या भवितव्यासाठी लढाई आहे."
महायुती सरकारने सर्व काही हिरावले
"महाविकास आघाडीच्या काळात आपण मुंबईकरांसाठी जे काही विकासकामे केली, त्या सुविधांचा लाभ जनतेला मिळत होता. मात्र, सध्याच्या महायुती सरकारने त्या सगळ्यांवर पाणी फेरलं आहे. हे वास्तव जनतेपर्यंत पोहोचवा," असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
दरम्यान, ठाकरे यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची आठवण करून दिली. संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सेनेला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागले. तर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत गेलेल्या गटाला 57 जागा मिळाल्या होत्या. ही चूक महापालिकेत होऊ देऊ नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
मुंबई हे उद्धव सेनेचे गड
उद्धव सेनेच्या 20 आमदारांपैकी 10 आमदार मुंबईतून निवडून आले आहेत. यावरूनच पक्षासाठी मुंबईचे महत्व अधोरेखित होते. मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक पक्षासाठी केवळ राजकीय नव्हे, तर अस्तित्व टिकवण्यासाठीची निर्णायक निवडणूक ठरणार आहे.
ठाकरे यांनी सांगितले की, "विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांनी मैदानात उतरून जनतेशी थेट संपर्क साधावा. शाखांना भेटी द्याव्यात, नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिरे, संवाद सभा, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे."