Eknath Shinde : शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी, कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी अचानक बहिष्कार टाकला आणि मंत्रालयात राजकीय हालचालींना वेग आला.
मंत्रिमंडळाची बैठक सातव्या मजल्यावर सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा कोणताही मंत्री उपस्थित राहिला नाही. भाजपात गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या अनेक स्थानिक नेत्यांची ‘इन्कमिंग’ झाल्याने शिंदे गट नाराज असल्याचे समोर आले आहे. ही नाराजीच त्यांनी बहिष्काराच्या माध्यमातून व्यक्त केली. बैठक संपल्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहाव्या मजल्यावर भेट घेण्यासाठी गेले. या भेटीत महायुतीतील अंतर्गत राजकारण, भाजपात होत असलेले प्रवेश आणि त्यामुळे निर्माण झालेला संताप या मुद्द्यांवर चर्चा झाली. अखेर या चर्चेत तिघा पक्षांनी एकमेकांचे आमदार किंवा पदाधिकारी फोडणार नाही, असा निर्णय घेऊन तणाव निवळवण्याचा प्रयत्न झाला.
यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले,
"महायुतीमधील नाराजीनाट्यावर पडदा पडला आहे. एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली आहे. आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून सर्वात जास्त जागांवर युती करायची आहे."
शिंदे यांनी पुढे म्हटले की,
"आमचे एनडीएचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा आहे. गोरगरिबांच्या चांगल्या दिवसांसाठी महायुती काम करणार आहे." नाराजी, चर्चा आणि निर्णय या संपूर्ण घडामोडींमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असला तरी फिलहाल परिस्थिती ताब्यात आल्याचे संकेत शिंदेंच्या प्रतिक्रियेतून दिसत आहेत.

