Sanjay Raut : शिवसेना–मनसे आधीच एकत्र; “परवानगीची गरज नाही” राऊतांचा काँग्रेसवर जोरदार टोला

Sanjay Raut : शिवसेना–मनसे आधीच एकत्र; “परवानगीची गरज नाही” राऊतांचा काँग्रेसवर जोरदार टोला

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला महाविकास आघाडीत सामील करायचे की नाही, यावर काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Edited by:
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला महाविकास आघाडीत सामील करायचे की नाही, यावर काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला असताना, काही वरिष्ठ नेत्यांचा कल मात्र मनसेला सोबत घेत लढण्याकडे आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत शिवसेना–मनसे एकत्रीकरणाची ‘लोकइच्छा’ पुन्हा अधोरेखित केली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “काँग्रेसचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा असू शकतो. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही हा निर्णय त्यांच्या घरचा नियम असेल. पण शिवसेना आणि मनसे हे आधीपासूनच एकत्र आले आहेत. हे एकत्र येणं ही जनतेची इच्छा आहे आणि यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची किंवा आदेशाची अजिबात गरज नाही.” राऊतांनी यावेळी शरद पवारांसह डावे पक्षही “मुंबई वाचवण्यासाठी आमच्यासोबत आहेत” असा दावा करत महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एका नव्या रचनेत दिसण्याचे संकेत दिले.

ठाकरे बंधू एकत्र लढणार, राऊतांचे मोठे विधान

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “काँग्रेस काय निर्णय घेते ते त्यांचं ठरलेलं राहू दे. पण मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे – दोन्ही बंधू एकत्रच लढणार. स्थानिक पातळीवरील लहान पक्षांचाही आम्हाला पाठिंबा आहे.” त्यांच्या या विधानानंतर शिवसेना–मनसे युतीत आता औपचारिक घोषणा फक्त वेळेची राहिली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

काँग्रेसमध्ये तणाव: वर्षा गायकवाड नकारात, वडेट्टीवार सकारात्मक

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाण्याच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. मात्र राज्यातील वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी यास 180 अंशाने वेगळी भूमिका मांडली आहे. वडेट्टीवार म्हणाले, “काही ठिकाणी स्थानिक पातळीवर काँग्रेस–मनसेने आधीच सहयोग केला आहे. ज्याठिकाणी गरज आहे तिथे मनसेसोबत जायला काही हरकत नाही. भाजपविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे. विचार जुळत नसले तरी आघाडी करणे आवश्यक आहे.”

त्यांची ही भूमिका शरद पवारांच्या विधानाशी मिळतीजुळती आहे. पवारांनीही अलीकडेच मनसेसोबत जाण्याविषयी सकारात्मक संकेत दिले होते.

राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस–शिवसेना–राष्ट्रवादीच्या भूमिकांमध्ये वाढत्या मतभेदांमुळे आगामी मुंबई निवडणुकीत नवी राजकीय रचना दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊतांच्या आजच्या भूमिकेमुळे शिवसेना–मनसे एकत्र लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जात असून, यामुळे काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. पुढील काही दिवसांत या घडामोडींवरून महाराष्ट्राचे राजकारण एका नव्या टप्प्यात प्रवेश करेल, हे निश्चित.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com