Sanjay Shirsat : “मातोश्री तुमचे ऐकणार नाही, दानवेंचे जोडे उचलावे लागतील”; संजय शिरसाट यांचा चंद्रकांत खैरेंना इशारा

Sanjay Shirsat : “मातोश्री तुमचे ऐकणार नाही, दानवेंचे जोडे उचलावे लागतील”; संजय शिरसाट यांचा चंद्रकांत खैरेंना इशारा

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी खैरेंना उद्देशून केलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे अनुपस्थित राहिले, आणि यावरून निर्माण झालेल्या वादाने आता थेट मातोश्रीच्या दारापर्यंत मजल मारली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी खैरेंना थेट इशारा देत, “एक दिवस अंबादास दानवेंचे जोडे उचलावे लागतील,” असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाची बैठक असूनही आपल्याला निमंत्रण न देण्यात आल्याचा आरोप खुद्द चंद्रकांत खैरेंनी केला आहे. यामागे अंबादास दानवे यांचा हात असल्याचा दावा त्यांनी करताना, “दानवे काड्या करत आहेत,” अशी थेट टीका केली. खैरे यांनी या मुद्द्यावरून मातोश्री गाठली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी खैरेंना उद्देशून केलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. “मातोश्रीवर तुमचे ऐकले जाणार नाही. अडीच वर्षांपूर्वी आम्हीही सांगायला गेलो होतो की, काँग्रेस-राष्ट्रवादीपासून वेगळे व्हा, पण त्यांनी ऐकले नाही आणि पक्ष फुटला,” असे शिरसाट म्हणाले. त्यांनी पुढे म्हणताना खैरेंना शिंदे गटात येण्याचे आमंत्रणही दिले. “खैरेंनी वेळेत निर्णय घेतला नाही, तर भविष्यात दानवेंचे जोडे उचलावे लागतील,” असा रोखठोक इशारा त्यांनी दिला.

पुढे शिरसाट म्हणाले की, “ते ज्येष्ठ आहेत, निष्ठावान आहेत, भावनिक होतात, आणि हे लक्षात घेऊनच दानवे वारंवार त्यांना डिवचतात, बैठकीस निमंत्रण न देणे, माहिती न देणे यामागे हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच पुढे म्हणाले की, यातून खैरेंना चिडवून जाहीर प्रतिक्रिया दिल्या जातात, आणि त्यांची बदनामी मातोश्रीवर होते,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, सोमवारी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. “माझ्या अनुपस्थितीत कार्यक्रम घेणे योग्य नव्हते. मला निमंत्रणच नव्हते. उद्धवजींना मी सर्व सांगणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागत आहे, पण तो काही महिन्यांचा पाहुणा आहे. शिवसेना मी वाढवली आहे, तो नंतर आला आणि फक्त गोंधळ घालतो आहे,” असा घणाघात खैरेंनी केला.

शिवसेनेतील हा अंतर्गत संघर्ष केवळ दोन नेत्यांमध्ये मर्यादित न राहता, पक्षाच्या आगामी राजकीय दिशादर्शकांवर प्रभाव टाकू शकतो. शिंदे गटाकडून सावरले जाणारे नेते, ठाकरे गटातल्या असंतोषात भर घालणाऱ्या घटना आणि ‘मातोश्री’च्या भूमिकेवरून होणारे आरोप-प्रत्यारोप यामुळे पक्षांतर्गत समीकरणे बदलण्यासाठी पक्षात आमंत्रण देऊन जाळे पसरवले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com