थोरात वाद चिघळू नये, टपून बसलेल्या भाजपाच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये; सामनातून टीका
Admin

थोरात वाद चिघळू नये, टपून बसलेल्या भाजपाच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये; सामनातून टीका

नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात हा वाद विकोपाला गेला आहे.

नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात हा वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यावर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. "पटोले हे मेहनती आहेत आणि भारतीय जनता पक्षात बंड करून ते काँग्रेस पक्षात आले. ते पक्षवाढीसाठी कष्ट घेतात, पण संकटकाळात ज्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले अशा 'घराण्यां'शी नाहक पंगा घेऊन राज्यात त्यांचा पक्ष कसा वाढणार? पटोले यांनी वाद न वाढवता पक्ष पुढे नेला तर 2024 साली महाविकास आघाडीस नक्कीच फायदा होईल. नाहीतर 2024 आधी कमळाबाईवरील भुंगे काँग्रेसच्या उरलेल्या मधाच्या पोळ्यांवर बसतील. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पटोले-थोरात वाद चिघळू नये. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा. पटोले व थोरात हे शहाणे नेते आहेत. फार काय बोलावे?", असं सामनात म्हटलंय. असे सामनातून म्हटले आहे.

नगर जिल्ह्यात त्यांनी आधी विखे-पाटलांना 'मेकअप' करून भाजपमध्ये आणले आणि आता त्यांचा सत्यजीत तांबेंवर डोळा आहे. त्यात बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्याने बंडाचे दंड थोपटल्याने भाजपच्या मनी उकळ्याच फुटल्या असतील. म्हणून थोरातप्रकरणी काँग्रेसने सावध राहायला हवे. थोरांताच्या धमन्यांत काँग्रेस विचारांचेच रक्त आहे, पण आज ते संतापले आहेत. सत्यजीत तांबे हे पदवीधर मतदारसंघात निवडून आले आणि म्हणाले, मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. काँग्रेसकडे शहाणपण असते तर विधान परिषद निवडणुकीतील सत्यजीत तांबे यांच्या विजयानंतर त्यांनी थोरातांशी चर्चा करून या प्रकरणावर सन्माननीय पडदा टाकला असता. पण वाडा पडला तरी अहंकाराचा झेंडा फडकत ठेवायचा हे धोरण दिसते. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज जे घडतेय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते. असे सामनातून सांगण्यात आले आहे.

यासोबतच "बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे जुनेजाणते आणि महत्त्वाचे नेते आहेत. थोरात हा महाराष्ट्र काँग्रेसचा एक निष्ठावंत चेहरा आहे. अनेक वाद-वादळांत थोरातांनी काँग्रेसला धरून ठेवले. अत्यंत संयमी व शांत असे त्यांचे नेतृत्व आहे, पण थोरातांनी सध्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. थोरातांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षाच्या उरलेल्या फांद्या हलू लागल्या आहेत. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे कठीण आहे, असे सांगून थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले विरुद्ध थोरात हा वाद बरेच दिवस खदखदत होता. त्यास आता उघड तोंड फुटले. थोरातांच्या संयमाचा बांध फुटल्यामुळे हे घडले काय? याचा विचार आता त्यांच्या हायकमांडने केला पाहिजे.

तसेच सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे युवा नेते आणि थोरातांचे 'भाचे' आहेत. तांबे-थोरात कुटुंबाचे संगमनेरमध्ये वर्चस्व आहे. तांबे प्रकरणात आपल्याला विश्वासात घेतले नाही ज्येष्ठता असूनही अपमानित केले असा संताप बाळासाहेब थोरातांचा आहे आणि त्यात तथ्य असू शकते. थोरात यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान नाही राखायचा, तर कोणाचा राखायचा? असे सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com