Uddhav Thackeray Prakash Ambedkar
Uddhav Thackeray Prakash AmbedkarTeam Lokshahi

शिवशक्ती व भीमशक्ती हीच महाराष्ट्रासह देशाची महाशक्ती ठरो; सामनातून भाष्य

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली. या युतीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. याची घोषणा उध्दव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून भाष्य करण्यात आले आहे. सामनातून म्हटले आहे की, “दिल्लीतील सत्ता लोकशाही व स्वातंत्र्याचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहे व आता त्यांनी न्यायालयांवरही ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. हे देशाच्या भवितव्यासाठी घातक आहे. या बुलडोझरखाली चिरडायचे नसेल तर मतभेद गाडून ऐक्याचा नारा देणे हाच पर्याय आहे. “या लढण्यासाठी कुणीतरी दोन पाऊले पुढे यायला हवे होतेच. आता प्रत्यक्ष संविधान निर्मात्यांचे वारसदार प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांनी देशातील विद्यमान हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी पुढाकार घेतला हे बरेच झाले. असे सामनातून म्हटले आहे.

तसेच काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत वेगळे मत आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचेही या दोन पक्षांविषयी वेगळे मत होतेच व पुढे किमान समान कार्यक्रमांवर हे तीन पक्ष एकत्र आले व त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चालवले. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसला अॅड. आंबेडकरांची अडचण वाटण्याचे कारण नाही.”“महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण उदयास आले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेने एकत्र येऊन राजकारण तसेच समाजकारण करण्याचे ठरवले आहे व नव्या राजकीय पर्वाची ही नांदी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी या नव्या राजकीय युतीची घोषणा झाली व स्वतः उद्धव ठाकरे यांनी दादरच्या आंबेडकर भवनाच्या वास्तूत जाऊन प्रकाश आंबेडकरांच्या सोबतीने घोषणा केली. शिवशक्ती व भीमशक्तीचे काही प्रयोग याआधीही महाराष्ट्रात झाले, पण महाराष्ट्राची जनता ज्या युतीची आतुरतेने वाट पाहत होती ती युती म्हणजे ‘आंबेडकर-ठाकरे’ यांचे एकत्र येणे. एक तर महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात आंबेडकर-ठाकरे नावाला एक तेजस्वी संघर्षाचा इतिहास आहे. राजकारणापेक्षा या दोन्ही कुटुंबांच्या पूर्वजांनी समाजातील अनिष्ट रूढी, जातीप्रथा या विरोधात लढे दिले. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत व आज देशात सर्वच स्तरांवर संविधानाची मोडतोड करून राज्य चालवले जात आहे. बेकायदेशीर मार्गाने मिळविलेल्या सत्तेच्या डळमळीत खुर्च्या टिकविण्यासाठी संविधानाचे टेकू लावले जात आहेत. ही एक प्रकारची हुकूमशाही आहे. देशातील राजकीय नेतृत्व खतम करण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचा हल्ला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला व तो योग्यच आहे.”असे सामनातून म्हटले आहे.

यासोबतच विवेक, नीतिमत्तेच्या बळावर राजकारण करण्याचा उद्धव ठाकरेंसह प्रयत्न करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात नैतिकतेचे अधःपतन व स्वाभिमानाचा ऱ्हास सुरू असताना ‘आंबेडकर-ठाकरे’ या शक्तीचा उदय व्हावा हा शुभ संकेत आहे. शिवशक्ती व भीमशक्ती हीच महाराष्ट्रासह देशाची महाशक्ती ठरो!” असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com