"निलम गोऱ्हे या गाड्या देऊन पदं मिळवत होत्या...", अखिल चित्रेंचा निलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Published by :
Team Lokshahi

सध्या शिंदे गटाच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे चर्चेत आल्या आहेत. दिल्ली येथील साहित्य संमेलनामध्ये निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांमध्ये त्यांनी ठाकरेंच्या घरी दोन मर्सिडिज पोहोचल्या की पद मिळतं असे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी संताप व्यक्त केला आहे. निलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे त्यांनी तितक्या मर्सिडिज दिल्या का? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "आजपर्यंत डॉ. निलम गोऱ्हे यांनी 9 पदांसाठी 18 मर्सिडिज दिल्या म्हणजे निलम गोऱ्हे या गाड्या देऊन पदं मिळवत होत्या असं मानावं का? म्हणजे ही पदं त्यांनी स्वकर्तृत्वावर मिळवली नव्हती. कृपया महाराष्ट्राने याची दाखल घ्यावी, कारण,

२००२ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निवड (पहिला कार्यकाल)

२००८ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (दुसरा कार्यकाल)

२०१० : शिवसेना पक्षाचे प्रवक्ते

२०११ पासून: शिवसेना उपनेते

२०१४ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (तिसरा कार्यकाल)

२०१५: विशेष हक्क समिती (विशेष हक्क समिती) अध्यक्ष, महाराष्ट्र विधान मंडळ

२०१९: महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापती म्हणून निवड

२०२०: महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (चौथा कार्यकाल)

२०२०: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून पुनर्निवड ते आजतागायत

नीलम ताई तुम्ही म्हणता १ पदासाठी शिवसेनेत २ मर्सिडीज द्यावी लागतात मग वरील ९ पदांसाठी तुम्ही दिलेल्या १८ मर्सिडीजची माहिती महाराष्ट्रासमोर मांडू शकलात तर बरं होईल. २२ फेब्रुवारी १९९८ रोजी म्हणजे बरोबर २७ वर्षांपूर्वी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजींच्या कार्यकाळात इतकं मिळूनही अन्याय म्हणत असाल तर तुम्हाला साहित्याची पार्श्वभूमी आहे म्हणून सांगतो 'हा शुद्ध कृतघ्नपणा आहे' !".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com