“तेव्हा CM असणाऱ्या फडणवीसांना आम्हीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करु शकतो, पण…” सामनातून हल्लाबोल

“तेव्हा CM असणाऱ्या फडणवीसांना आम्हीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करु शकतो, पण…” सामनातून हल्लाबोल

याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणावरुन सुरु असणाऱ्या वादावरुन राजकीय वर्तुळातून आता अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत.

याकूबच्या कबरीवरुन सुरु असणाऱ्या वादावरुन राजकीय वर्तुळातून आता अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच याकूबचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख करत याकूबचा दफनविधी तुरुंगाच्या आवारातच झाला असता तर हा वाद निर्माण झाला नसता असं सामनातून म्हटले गेले आहे. “मूळ प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करायचे असले की हिंदू-मुसलमान, हिजाब, भारत-पाकिस्तान अशा विषयांची मढी उकरून समाजात तणाव निर्माण करायचा हेच यांचे धंदे आहेत. मुळात कोण कुठला तो याकूब? त्याचा कुणाशी संबंध का जोडायचा? शिवसेना आज सत्तेवर असती व याकूबच्या कबरीचा विषय उकरून कोणी त्या कबरीतली माती भाजपावर उडवली असती तर आम्ही तेथेच त्यांचे थोबाड बंद करून जाब विचारला असता, ‘ते आमचे राजकीय विरोधक असतीलही, पण त्यांच्यावर असले घाणेरडे आरोप करणे योग्य नाही. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष बॉम्बस्फोटांतील आरोपींचे वा त्यांच्या कबरीचे उदात्तीकरण करणारा नाही. तेव्हा थोबाडे बंद करा!’ ही आमची भूमिका आजही ठाम आहे. याकूब मेमनला बॉम्बस्फोटप्रकरणी नागपूर तुरुंगात फाशी दिले. खरं तर अशा प्रकारच्या आरोपींचे ‘दफन’ हे तुरुंग परिसरातच केले जाते. संसदेवरील हल्ल्यांचा सूत्रधार अफझल गुरू याला फासावर लटकवले व तिहार कारागृहाच्या आवारातच दफन केले. कश्मीरात तेव्हा तणाव निर्माण झाला. याकूब मेमनच्या बाबतीत हे सर्व सोपस्कार नागपुरातच करता आले असते. म्हणजे पुढचे कबरीचे प्रकरण घडलेच नसते, पण तेव्हा मुख्यमंत्री होते आपलेच देवेंद्रजी. त्यांनी उदार अंतःकरणाने एका दिलदारीने याकूबचा मृतदेह मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना सोपवला. माहीम येथून त्याची मोठी अंत्ययात्रा निघाली. बडा कब्रस्तानात त्याचे दफन झाले. त्यामुळे विषय संपला होता, पण आता तो आता पुन्हा बाहेर पडला,” असा आरोप शिवसेनेने सामनातून केले आहे.

“याकूब कबरीच्या प्रकरणात आम्हीही फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शंभर प्रश्नांचा भडीमार करू शकतो, पण राजकारण इतक्या खालच्या स्तरावर निदान आम्ही नेऊ इच्छित नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. मुंबई दंगलीचा आणि बॉम्बस्फोटांचा सर्वात मोठा घाव शिवसेनेवरच बसला. तेव्हा हे आजचे ‘कुळे-बुळे’ हिंदुत्ववादी कोणत्या बिळांत लपून बसले होते हे महाराष्ट्र जाणतो. आज याकूब याकूब म्हणून छाती पिटणारे तेव्हा कोणत्याच लढाईत नव्हते. शिवसेनाच सगळ्यांची रक्षणकर्ती म्हणून पुढे होती. याकूब मेमनच्या कबरीवरील सजावटीची चौकशी करण्याची घोषणा (उप)मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. होऊनच जाऊ द्या! आम्ही त्या चौकशीचे स्वागतच करीत आहोत,” असे सामनातून म्हटले गेले आहे.

तसेच गेल्या वर्षभरातच १० हजार ८८१ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून बाहेर आली आहे. याकूबच्या कबरीचे राजकीय भांडवल करणाऱ्या कुळ्या-बुळ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या कराव्या लागलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या चितेवरील राखेवरही दोन अश्रू ढाळावेत,” असे शिवसेनेनं म्हटले आहे.

यासोबतच “महाराष्ट्राची सत्ता ओरबाडून घेतल्यावर तरी भाजपाचा आत्मा शांत होईल असे वाटले होते; पण भाजपाचा आत्मा मरून त्याची जागा पिशाच्चाने घेतली आहे याविषयी महाराष्ट्रीय जनतेच्या मनात तिळमात्र शंका राहिलेली नाही. भारतीय जनता पक्षातील काही बावनकुळेंनी याकूब मेमन प्रकरणात जी ‘बुळे’गिरी चालवली आहे तो सर्वच प्रकार किळसवाणा आहे. मुंबई बॉम्बस्फोटांतील फाशी दिलेला आरोपी याकूब मेमन याच्या कबरीतील परिसरात दिवे लावले. ती कबर संगमरवरी दगडाने सजवली व त्याचे खापर भाजपामधील कुळ्यांनी आणि बुळ्यांनी शिवसेनेवर फोडले. सध्या महाराष्ट्रातील सर्व जीवनावश्यक विषय जणू संपले आहेत. त्यामुळेच भाजपाने याकूब मेमनची कबर खणण्याचे कार्य हाती घेतले आहे,” असा हल्लाबोल शिवसेनेने भाजपावर केला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com