Shrikant Shinde With Raj Thackeray
Shrikant Shinde With Raj Thackeray

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची सभा होणं महत्त्वाचं असल्याने नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली.
Published by :

कल्याण लोकसभेची अधिकृत उमेदवारी श्रीकांत शिंदे यांना नुकतीच घोषित करण्यात आली. तर ठाणे लोकसभेसाठी ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आलीय. ठाणे जिल्ह्यात मनसेचाही बोलबाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची सभा होणं महत्त्वाचं असल्याने नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी तरुण पिढीत उत्सुकता आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे मोठ्या मनाने महायुतीसोबत जोडले गेले आहेत. नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून पूर्ण ताकद महायुतीच्या पाठिशी उभी करतील, असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

श्रीकांत शिंदे माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि माझी कल्याण लोकसभेची उमेदवारी अधिकृपणे जाहीर झाली. राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलोय. त्यांनीही आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी त्यांची सभा होईल. आधीपासूनच आम्हाला त्यांचं सहकार्य आणि प्रेम मिळत आहे.

महायुतीत शिवसेना १५ जागांवर लढत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी महायुती निर्माण झाली आहे. लोकांच्या हिताचं काम हे सरकार गेल्या दोन वर्षांपासून करत आहे. महाराष्ट्रात सर्वच सर्व जागा निवडून आण्यासाठी महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते कामाला लागले आहेत. कुणाला तिकीट मिळेल, महायुतीचा कार्यकर्ता असा विचार करत नाही. महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल, याचाच ते विचार करतात आणि महायुतीचं ठाण्यातील काम मोठं आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने जिंकतील, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com