Axiom Mission: एक्स-4 मोहीमच्या प्रक्षेपणासाठी शुभांशु शुक्ला सज्ज; 'फाल्कन 9' लाँच पॅडवर
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या सहभागामुळे चर्चेत असलेली एक्स-4 (Ax-4) मोहीम आता प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. फाल्कन 9 रॉकेटवर ड्रॅगन अंतराळयान ठेवण्यात आले असून, ते फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील लाँच पॅड 39A वर नेण्यात आले आहे. हे ऐतिहासिक प्रक्षेपण 10 जून 2025 रोजी सकाळी 8.22 वाजता होणार असून, हवामान प्रतिकूल असल्यास 11 जूनसाठी राखीव वेळ उपलब्ध आहे.
ही मोहीम विशेष आहे कारण ड्रॅगन यानाचा हा पहिलाच उड्डाण असेल. फाल्कन 9 चा पहिला टप्पा याआधी एकदा स्टारलिंक मोहिमेसाठी वापरण्यात आलेला आहे आणि या वेळेस ते स्टेज विभाजनानंतर केप कॅनव्हेरल येथील लँडिंग झोन 1 वर अचूकपणे परत उतरण्याचा प्रयत्न करेल. शुभांशु शुक्ला हे या मोहिमेतील चार सदस्यीय आंतरराष्ट्रीय दलातील एकमेव भारतीय आहेत. त्यांनी SpaceX आणि Axiom Space कडून विशेष प्रशिक्षण घेतले आहे आणि या मोहिमेत ते ड्रॅगन यानाचे संचालन व डॉकिंग प्रक्रियेचे निरीक्षण करतील.
14 दिवसांच्या या मोहिमेदरम्यान, अंतराळ स्थानकावर मानव संशोधन, पृथ्वी निरीक्षण, तसेच जैव व पदार्थ विज्ञानाशी संबंधित 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले जातील. सध्या लाँच पॅडवर अंतिम तयारी सुरू असून, अंतराळयान झेप घेण्यासाठी तयार आहे. या ऐतिहासिक मोहिमेचे थेट प्रक्षेपण प्रक्षेपणाच्या दोन तास आधी सुरू होणार आहे, आणि जगभरातून लोक या प्रसंगाचा साक्षीदार होणार आहेत.
नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील लाँच कॉम्प्लेक्स 39A हे याआधी अपोलो आणि शटल मोहिमांसाठी वापरले गेले आहे. त्यामुळे अॅक्स-4 मोहिमेचे प्रक्षेपण ऐतिहासिक स्थळी होत आहे. ही मोहीम व्यावसायिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात असून, खासगी क्षेत्रातील अंतराळ संशोधनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.