Silver Oak Attack Case : सदावर्तेंना पुन्हा दोन दिवसांची कोठडी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) पुन्हा कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना आता १३ एप्रिल पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांची सुटका होऊ शकणार नाही. पोलिसांना त्यांची चौकशी करायची असल्याने ही कोठडी देण्यात आलेली आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या आंदोलकांना भडकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी चौकशी करण्याची गरज असल्याने पोलिसांनी ही कोठडी मागितली होती. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज सदावर्तेंना ११ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
दरम्यान, मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी एका वृत्तवाहिनीवर बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस (Satara Police) मुंबईत दाखल झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी याबद्दलची तक्रार दाखल झाली होती. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावर जुना गुन्हा दाखल असल्याने त्याप्रकरणी सातारा पोलीस त्यांना मुंबईतून ताब्यात घेण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे सदावर्ते यांना सिल्व्हर ओक प्रकरणात जामीन मिळाला असता तरी त्यांना सातारा पोलीस ताब्यात घेतील अशी शक्यता होती.