Pune News: पर्यटकांसाठी खुशखबर! सिंहगड किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला, नवीन नियमावली जारी
पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सिंहगड किल्ला 5 जून 2025 पासून पुन्हा एकदा पर्यटकांच्या भेटीसाठी खुला होत आहे. अलीकडेच झालेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेमुळे 29 मे पासून किल्ला काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला होता. या मोहिमेअंतर्गत वन विभाग, महसूल विभाग, पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करत 141 अनधिकृत स्टॉल्स आणि काही आरसीसी बांधकामे हटवली.
सिंहगड किल्ला हा इतिहासप्रेमी व निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. ट्रेकिंगसाठी सुमारे 2.7 किमीचा मार्ग असून, त्यात 600 मीटर उंची वाढ होते. प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन करत किल्ल्याच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आहे. किल्ल्याच्या आव्हानात्मक संरचनेमुळे या ठिकाणी यंत्रसामग्री वापरणे कठीण होते, त्यामुळे संपूर्ण अतिक्रमण हटवण्याचे काम हाताने पार पाडले गेले. यामुळे किल्ल्याचा ऐतिहासिक आणि पर्यावरणीय ठसा अबाधित ठेवण्यास मदत होणार आहे.
५ जूनपासून किल्ला उघडला जाणार असला तरी काही नवीन नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 1 जूनपासून प्लास्टिकच्या वस्तूंवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. विशेषतः पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांवर डिपॉझिट प्रणाली लागू केली आहे. पर्यटकांनी बाटल्या परत केल्यास त्यांना जमा रक्कम परत दिली जाईल. पर्यटकांनी सिंहगडाच्या व राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या सौंदर्याचा अनुभव घेताना निसर्गसंवर्धन आणि वारसासंवर्धन याची जाणीव ठेवावी, कारण हे किल्ले फक्त इतिहास नाहीत, तर आपली संस्कृती आणि स्वाभिमानाची शिदोरी आहेत.