ऐकावं ते नवलंच; लग्नाच्या सहा दिवस आधी सासू जावयासोबत पळाली
अलिगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या लग्नाला अवघे सहा दिवस उरले असताना तिची सख्खी आई म्हणजेच सासू आपल्या २५ वर्षीय जावयासोबत फरार झाली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबाला समाजात अपमानास्पद स्थितीला सामोरे जावे लागत आहे.
फरार झालेली महिला 38 वर्षांची असून, तिच्या मुलीचे लग्न 16 एप्रिलला होणार होते. मात्र, तिच्या आईनेच मुलीचा भावी नवरा फसवून त्याच्यासोबत पळ काढला. इतकेच नव्हे, तर घरात ठेवलेले 5 लाख रुपयांचे दागिने आणि 3.5 लाखांची रोकड घेऊन ती फरार झाली. जावई सतत सासरच्या घरी येत असे आणि अनेकदा सासूबाईंसोबत तासनतास वेळ घालवत असे. या दोघांच्या जवळीकेवर कोणीही संशय घेतला नाही. त्यांच्या नात्याचा उलगडा तब्बल लग्नाच्या आधीच झाला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या प्रकारामुळे मुलीला जबर मानसिक धक्का बसला आहे. तिची प्रकृती बिघडली असून ती उपचार घेत आहे. रागाने ती म्हणाली, “दोघांनी कुठेही जाऊन मरण पत्करावं. आता आमच्या कुटुंबाचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही.”
फरार महिलेचा पती जितेंद्र कुमार याने सांगितले की, "तो व्यवसायासाठी बंगळुरूमध्ये असतो. पत्नी व जावई यांच्यातील व्यवहारांवर त्याला पूर्वीच संशय होता. मात्र लग्न जवळ असल्याने त्याने दुर्लक्ष केले. आता मात्र त्याला पत्नीच्या अशा कृत्यामुळे समाजात मान खाली घालावी लागत आहे."
जितेंद्र कुमार म्हणाले, “माझ्या पत्नीने आपल्या मुलीच्या आयुष्याशी खेळ केला. पोलिसांनी तिला लवकरात लवकर पकडून माझ्यासमोर आणावं. मला तिचा चेहरा पाहायचाय आणि विचारायचंय की, तिनं असं का केलं?”
पोलिसांनी याप्रकरणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली असून, रोख रक्कम आणि दागिने चोरीचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. दोघांचे मोबाईल सध्या बंद असून, शेवटचे लोकेशन जिल्ह्याच्या हद्दीत मिळाले होते. पाळत ठेवणारी टीम सतत त्यांच्या मागावर आहे.
सीओ महेश कुमार यांनी सांगितले की, “दोघेही प्रौढ आहेत. त्यामुळे त्यांच्या परस्पर संमतीने संबंधांवर कायद्यानुसार गुन्हा होत नाही. मात्र, चोरीच्या तक्रारीनुसार पोलीस तपास सुरु आहे. लवकरच त्यांचा शोध लावण्यात येईल.” या प्रकरणामुळे एक सन्मानित कुटुंब समाजात थट्टेचा विषय बनले आहे.