Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक ! फार्मा कंपनीच्या मेडिकल वेस्टमधून एमडी पावडरची परराज्यात तस्करी, पाच आरोपींना अटक

Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक ! फार्मा कंपनीच्या मेडिकल वेस्टमधून एमडी पावडरची परराज्यात तस्करी, पाच आरोपींना अटक

आरोपींना विशेष वागणूक दिल्याचा व्हिडीओ व्हायरल, तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
Published by :
Team Lokshahi
Published on

वाळूज एमआयडीसीमधील एका औषधनिर्मिती करणाऱ्या फार्मा कंपनीच्या मेडिकल वेस्टमधून तयार करण्यात आलेली एमडी (मेथेड्रोन) पावडर परराज्यात तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एनडीपीएस (NDPS) पथकाने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून, त्यांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात मुख्य आरोपी बबन खान नजीर खान (६५), त्याचे दोन पुत्र कलीम खान बबन खान (४१), सलीम खान बबन खान (३५, तिघेही रा. जुना बाजार), तसेच वाहनचालक शफीफुल रहेमान तफजुल हुसेन (४५) व राज रामतिरथ अजुरे (३८, दोघेही रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.

एनडीपीएसच्या पथकाने २१ ते २३ जून या दरम्यान साजापूर चौफुली परिसरातील गोदामात छापा टाकून २ किलो ४७३ ग्रॅम एमडी पावडर आणि दोन टेम्पो असा एकूण १ कोटी ४३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, बबन खान याच्याकडे २०११ पासून मायलान फार्मा कंपनीचे भंगार उचलण्याचे कंत्राट होते. सदर कंपनी एड्स, कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांवरील औषधे तयार करते. कंपनीचे औषधी उत्पादनातील काही रसायने टाकाऊ स्वरूपात मेडिकल वेस्टमध्ये जातात. बबन खान हा हा वेस्ट गोदामात आणून त्यातून एमडी पावडर वेगळी करायचा व तिची तस्करी करायचा. ही पावडर गुजरातसह इतर राज्यांतील ड्रग्स तस्करांना पुरवली जात होती. त्याने काही व्यवहार बिटकॉईनद्वारे केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, अटक आरोपींना वाळूज पोलिस ठाण्यात विशेष वागणूक (व्हीआयपी ट्रीटमेंट) देण्यात आली असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com