Sonia Gandhi
Sonia GandhiTeam Lokshahi

सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात होणार चौकशी

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सोनिया गांधी यांना गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना संसर्गानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोनिया गांधींना 2 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी यांना 23 जूनला हजर राहण्यास सांगितलं आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली.

सोनिया गांधी यांना 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जयराम रमेश यांनी सांगितलं की, संध्याकाळी सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोनिया गांधी यांना 'फंगल इन्फेक्शन' झाल्याचं आढळून आलं, त्यावर उपचार करण्यात आले.

ईडीने सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. सोनिया गांधी यांना यापूर्वी 8 जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं, परंतु त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्यामुळे त्यांना तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी नवीन तारीख देण्यास सांगण्यात आलं होतं.

Lokshahi
www.lokshahi.com