South Korea मध्ये पार्टीदरम्यान चेंगराचेंगरी; 149 जण मृत्युमुखी;VIDEO पाहा
दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमध्ये हॅलोवीन पार्टीदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत आत्तापर्यंत 149 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या पार्टीतील 50 लोकांना हृयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. तर जवळपास 150 जण यामध्ये जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टीवलमध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी या पार्टीमध्ये सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर अचानक या गर्दीचे रुपांतर चेंगराचेंगरीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती यूं सुक-येओल यांनी योंगसान-गु जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद पथकाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे हॅलोवीन पार्टी?
ख्रिश्चन धर्मियांत 31 ऑक्टोबर रोजी हॅलोवीन हा उत्सव साजरा केला जातो. हॅलोवीन हा शब्द 1745 पासून वापरला जातो. पहिल्यांदा हा सण इंग्लंड आणि आयर्लंड येथे साजरा करण्यात आला होता. त्यानंतर हा सण जगभर साजरा केला जाऊ लागला. यावेळी मृत व्यक्तींचे आत्मा त्यांना भेटायला येतात असा समज आहे त्यामुळे हॅलोवीन पार्टीत भूतप्रेतांची वेशभूषा केली जाते. पूर्वजांच्या स्मरणासाठी साजरा केल्या जाणाऱ्या पार्टीत नारंगी आणि काळ्या रंगाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.