Raj Thackeray On Manoj Jarange Maratha Protest : "जरांगे इथे का आले? हे उपमुख्यमंत्री सांगतील" राज ठाकरेंचा नेमका रोख कोणाकडे?

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विषय पुन्हा गाजू लागला असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Published by :
Prachi Nate

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विषय पुन्हा गाजू लागला असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या या हालचालींवरून वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत म्हटलं, “जरांगे परत का आले याचं उत्तर मी देऊ शकत नाही. याचं खरं उत्तर फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात. या सगळ्या गोष्टी त्यांनाच माहिती आहेत. त्यामुळे यासंदर्भात काही विचारायचं असेल तर शिंदेंनाच विचारा.”

राज यांच्या या विधानामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण याआधी मनोज जरांगे यांनी जलसंपदा आंदोलन छेडलं असताना, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी शिंदे यांनी आश्वासन देऊन आंदोलनाला स्थगिती मिळवून दिली होती. मात्र आता पुन्हा जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत, यामागची कारणं आणि त्यांच्या पुढील भूमिका काय असेल, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, “माझ्या मते या सगळ्या गोष्टी सर्वांनाच माहिती आहेत. मला याबाबत उत्तर द्यायचं नाही. तुम्हाला हवं असलेलं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील. ते जेव्हा समोर येतील, तेव्हा त्यांना विचारा.”

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या पुन्हा ऐरणीवर आला असून जरांगे पाटलांच्या नव्या हालचालींनी सरकारसमोर नवे प्रश्न उभे केले आहेत. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे या घडामोडींना आणखी गती मिळाली असून राजकारणात नवा वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com