Uddhav Thackeray On Narendra Modi : “मोदी हे आपले शत्रू नाहीत, पण ते..." पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी केलं मोठ वक्तव्य
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मातोश्री निवासस्थानी धाराशिव जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मोदी हे आपले शत्रू नाहीत, पण ते जर आपल्याला शत्रू मानत असतील आणि शिवसेना संपवण्याचे कारस्थान रचत असतील, तर ते सहन केले जाणार नाही,” असे ते ठणकावले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 75 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत “आगामी काळात त्यांनी चांगला कारभार करावा” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अमित शहांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आमच्यावर घराणेशाहीचे आरोप केले जातात, पण जय शहाच्या हट्टामुळे देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचे नुकसान झाले आहे.” पाकिस्तानला दहशतवादाचे आश्रयस्थान म्हणत असतानाच त्यांच्या क्रिकेट संघासोबत सामने खेळले जातात, ही सरकारची दुटप्पी भूमिका देशासाठी धोकादायक असल्याचे मत त्यांनी नोंदवले.
भूतकाळातील मोदी सरकारच्या घोषणांचा उल्लेख करताना त्यांनी टोला लगावला की, “शेतकऱ्यांची कर्जमाफी, १५ लाख रुपये, स्मार्ट सिटी आणि अच्छे दिन या सगळ्या घोषणा आज त्यांच्या मानगुटीवर भूतासारख्या बसल्या आहेत.” राज्यातील आर्थिक स्थितीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारचा कारभार दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. “नऊ लाख कोटींपर्यंत कर्ज पोहोचत असताना सरकार कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कर्ज काढून दिवाळी साजरी करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल विचारले असता, उद्धव ठाकरे म्हणाले की, “गणेशोत्सवात त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांनीही माझ्या वाढदिवसाला मातोश्रीवर येऊन शुभेच्छा दिल्या. आमच्यात किती मोदक खाल्ले याचीच चर्चा झाली.” दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार का, यावर त्यांनी थोडक्यात उत्तर दिले की, “ते येतील, पण माध्यमांनी थोडी प्रतीक्षा करावी.”
मनसेसोबत युतीच्या चर्चेबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “मावशीने (राज ठाकरेंची आई) घरी येत राहा असे सांगितले होते, त्यामुळे येणं-जाणं सुरू आहे. युतीची घोषणा लवकरच केली जाईल.” यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबीयांची समीकरणे नव्या वळणावर जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.