फडणवीस-शिंदेंना अडकवण्याचा कट? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन

फडणवीस-शिंदेंना अडकवण्याचा कट? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन

महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या कटाचा तपास करण्यासाठी महायुती सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
Published by :
shweta walge
Published on

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचा आरोप भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दरेकर यांनी डिसेंबर महिन्यात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. आता या मागणीच्या आधारावर महायुती सरकारने सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहविभागाने काढलाय.

महायुती सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय ३१ जानेवारी रोजी काढला आहे. या विशेष तपास पथकात राजीव जैन (पोलीस उपमहानिरीक्षक, एसआरपीएफ, मुंबई), नवनाथ ढवळे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ मुंबई) आणि आदिकराव पोळ (सहायक पोलीस आयुक्त – मुंबई शहर) या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास पथकाला अहवाल सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी गेल्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये पाँइट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे एक प्रश्न विचारला होता. तत्कालीन सरकारच्या आदेशानुसार तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचे षडयंत्र रचले होते, असा आरोप दरेकर यांनी केला होता. त्याची एक ऑडिओ क्लीप होती. फडणवीस व शिंदे यांना अडकवा. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना ती जबाबदारी दिली होती. संजय पुनामिया यांचा जबाब वाचून दाखवतो. सदर आरोपीने एसीपी सरदार पाटील यांना विचारणा केली. तुम्ही टार्गेट नव्हता. तर, शिंदे व फडणवीस हे टार्गेट होते. हे व्हिडिओ समोर आले आहेत. सूड भावनेने सरकारने वागू नये असे सांगताना महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे यांचे वर्चस्व वाढत होते म्हणून सूडबुद्धीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप होता. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी नेमण्याची घोषणा केली होती. याच दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही अशाच प्रकारचा आरोप मागे केला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com