Latur Water Issue : Special Report दप्तराऐवजी चिमुकल्याच्या डोक्यावर हंडा, डोक्यावरचा हंडा कधी उतरणार?
लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहरातील काही भागात चार दिवसांऐवजी पाच - सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरात धरणातून दोन पंपांनी पाणी उपसा केला जात होता. मात्र यातील एक पंप दुरुस्तीसाठी बंद असल्याने एका पंपाने शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे चार दिवसाआड येणारे पाणी आता सहा दिवसाआड येत असल्याने नागरिकांना तांत्रिक पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातून पाणी पिवळे येत असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा लांबला आहे... दोन पंपाऐवजी एका पंपातून पाण्याची उचल लातूर शहरासाठी केली जात आहे. त्यामुळे चार दिवसांऐवजी आठ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहर वासीयांची पाणी असून गैरसोय होत आहे. लातूर शहरासाठी दररोज ५० ते ५५ एमएलडी पाणी मांजरा प्रकल्पातून उचलले जाते. मांजरा प्रकल्पावर दोन पंप सुरू करावे लागतात असल्याने प्रकल्पातील पाण्याची उसळी होऊन पिवळे पाणी येत आहे. यामुळे एकाच पंपातून पाण्याची उचल केली जात असल्याने लातूर शहरात पाणीपुरवठा चार दिवसांऐवजी आठ दिवसाला पाणी पुरवठा करावा लागत आहे. मांजरा प्रकल्पात मोठा साठा असताना ही लातूर शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील अनेक भागात आठ दिवसाला पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागत आहे. आठ दिवस पाणी साठवल्याने पाणी खराब होऊन आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. मुबलक पाणीसाठा असून ही वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्यकर्त्यांनी अनेक आश्वासने दिली मात्र लातूर शहरात पाणी टंचाईची समस्या कायमच असल्याची खंत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे.
लातूर शहराला गेल्या अनेक वर्षापासून कधी पावसाअभावी तर, पाणी साठा मुबलक प्रमाणात असून तांत्रिक पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लातूर शहराला पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना राबविण्यात आल्या मात्र शहराची पाण्याची समस्या जैसेथेच आहे. सध्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात मुबलक पाणी साठा असूनही आठ दिवसांची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा कधी होईल असा सवाल उपस्थित केला जात आहे.