Special Report : मराठा समाजाची लग्नासाठीची आचारसंहिता, काय आहेत नियम? जाणून घ्या...
पुण्यात वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनं महाराष्ट्र हादरला आणि महाराष्ट्रात अजूनही हुंड्यासारख्या चुकीच्या प्रथा सुरू असल्याचं समोर आले. त्यामुळे मराठा समाजाच्यावतीने लग्नासह इतरही कार्यक्रमांसाठी एक आचारसंहिता जारी केली आहे. राज्यात नवे नियम घालत मराठा समाजाला आवाहन केलंय वाचूयात, काय आहेत हे नियम? हे सांगणारा एक स्पेशल रिपोर्ट...
पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पुरोगामित्वाची आणि आधुनिक विचारांची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही हुंडा घेतला आणि दिला जातो, ही गंभीर गोष्ट त्यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या लग्नापासून ते रुखवतापर्यंत आणि लग्नानंतर दिल्या घेतलेल्या वस्तूंमध्येही हुंड्याने कसा शिरकाव केला होता, तेही उघड झाल आहे. त्यानंतर आता मराठा समाजाने पुरोगामी पाऊल उचलून एक नवी नियमावली जाहीर केली आहे. मराठा समाजातील विचारवंत, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक बैठक घेत हे नवे नियम करत मराठा समाजाला आवाहन केलं ज्यामध्ये लग्नसोहळा कसा करावा, लग्नानंतर सासर-माहेरच्यांनी कसं राहावं, याबाबत काही सूचना केल्या आहेत.
काय आहेत नियम पाहूयात
1. लग्नसोहळा 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीत करावा
2. प्री-वेडिंगचे प्रकार थांबवावे, केलाच तर तो लग्न सोहळ्यात दाखवू नका
3. लग्नाचा मुहूर्त किंवा ठरलेली वेळ कोणत्याही कारणाने चुकवू नये
4. लग्नात डीजे टाळून पारंपरिक वाद्य असावेत, लोक कलावंतांना वाव द्यावा
5. कर्ज काढून लग्नात मोठेपणा, बडेजाव करणं कटाक्षाने टाळावं
6.लग्नात नवरदेवापुढे दारू पिऊन धिंगाणा घालण्यावर बंदी असावी
7.लग्नसोहळ्यात हार घालताना नवरा-नवरीला उचलण्याचा प्रकार बंद करा
8. वधुपिता, नवरदेवाच्या वडिलांनाच फेटे बांधावेत, वऱ्हाडी, पाहुण्यांना फेटे नकोत
9.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दागिने, गाडीच्या चाव्या देऊन दिखावा नको
10. लग्नात हुंडा देऊ नये-घेऊ नये, हवं तर नवरा-नवरीच्या नावे बँकेत एफडी करावी
11. लग्न, सुपारी, साखरपुडा, हळदीचे कार्यक्रम एकाच दिवशी करावेत
12. लग्नातील जेवणात पाचपेक्षा जास्त पदार्थ नसावेत, अन्नाची नासाडी नको
13. लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये
14. लग्नानंतर पैसा, इतर वस्तूंसाठी सासरच्यांनी नवरीचा छळ करू नये
ही तर झाली लग्नसोहळ्याबाबतची नियमावली मात्र मराठा समाजाने इतरही काही नियम घालत आवाहन केली आहे.