Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले
रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्राची हिरकणी संयुक्ता काळे हिची वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५, रिओसाठी निवड झाली असून काल ब्राझील देशात स्पर्धा सुरु होण्यापूर्वी राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी संयुक्ताला दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच भारताचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकण्याच्या तिच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करीत तिला "महाराष्ट्राची हिरकणी" म्हणून संबोधत तिचा गौरव केला. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतानाच तिच्या प्रशिक्षक मानसी गावंडे आणि पूजा सुर्वे यांच्यासह संयुक्ताच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच येत्याकाळात आवश्यक असलेल्या क्रीडा सोयी सुविधासाठी थेट फोन करण्यावचे आवाहन करायला क्रीडा मंत्री कोकाटे विसरले नाहीत. ब्राझील आणि भारत देशाच्या टाइम झोनमध्ये आठ तासाचा फरक असल्याने तिकडे स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतातून रात्री उशिरा हा फोन केल्याचे समजते.
रिदमिक जिम्नॅस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ठाण्यातील संयुक्ता प्रसेन काळे ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५, रिओ (ब्राझील) या भव्य स्पर्धेसाठी निवडली गेली आहे. तिच्यासोबत भारताच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून मानसी गावंडे यांचीही निवड करण्यात आली आहे.
संयुक्ता ही भारतातून या स्पर्धेसाठी निवड झालेली एकमेव रिदमिक जिम्नॅस्ट असून ती वयाच्या पाचव्या वर्षांपासून फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकादमी, ठाणे येथे सराव करत आहे. तिला आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय जज व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पूजा सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
संयुक्ताने खेलो इंडिया युवा खेळ, राष्ट्रीय स्पर्धा आणि इतर अनेक स्पर्धांमध्ये एकूण १५० पदके, त्यापैकी १२५ सुवर्णपदके मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच तिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ७ वा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे.
संयुक्ता व प्रशिक्षक मानसी गावंडे हे दोघंही यापुढील कालावधीत भारतासाठी क्रीडा क्षेत्रात मोठं यश मिळवून देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
किमया कार्लेचेही क्रीडा मंत्र्यांकडून अभिनंदन
नवीन ऑलिंपिक सायकलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर २३ मार्क ओलांडणारी पहिली भारतीय रिदमिक जिम्नॅस्ट किमया कार्ले यांचे ही कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे. क्लुज-नापोका, रोमानिया २०२५ क्लब स्पर्धेत किमया कार्लेने ऐतिहासिक २३,००० ऑलिंपिक सायकल पूर्ण केल्याबद्दल क्रीडा मंत्री यांनी किमयाला "रिदमिकची किमयागार" म्हणून अभिनंदनाचा दूरध्वनी केला होता. किमया ही सुद्धा पूजा सूर्वे आणि मानसी गावंडे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.