Pehalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी मोठं यश! दहशतवाद्यांना मदत करणारा मुख्य आरोपी अटकेत

Pehalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी मोठं यश! दहशतवाद्यांना मदत करणारा मुख्य आरोपी अटकेत

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणारा मोहम्मद यूसुफ कटारिया याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. कटारिया हा लष्कर-ए-तोयबा (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं उघड झालं आहे.

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन घाटीत दहशतवाद्यांनी धर्म विचारून 26 भारतीय पर्यटकांची निर्घृण हत्या केली होती. पाकिस्तानस्थित टीआरएफ संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. याच हल्ल्यातील दहशतवाद्यांना कटारियाने दळणवळणासाठी मदत केली होती, असं तपासातून स्पष्ट झालं आहे.

श्रीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त केलेल्या शस्त्रास्त्रं आणि साहित्याच्या तपासणीतून कटारियाचं नाव पुढे आलं. तपासात त्याने दहशतवाद्यांना सुविधा पुरवल्याचा पुरावा मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

कटारियाच्या अटकेनंतर पोलिसांनी सांगितलं की, त्याने केवळ दहशतवाद्यांच्या हालचालींना मदत केली नाही, तर दळणवळण यंत्रणा सक्षम करण्यामध्येही त्याची मोठी भूमिका होती. दक्षिण काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या नेटवर्कला कमजोर करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

अधिक तपास सुरू असून कटारियाच्या इतर सहकाऱ्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी मोहिम राबवली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मोहम्मद यूसुफ कटारिया हा मूळचा स्थानिक रहिवासी असून, काही काळ तो मुलांना शिकवण्याचं काम करत होता. परंतु गेल्या काही महिन्यांत तो दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला आणि त्यांच्यासाठी काम करू लागला, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर राबवत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. यानंतर 28 जुलै रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

कटारियाच्या अटकेमुळे पहलगाम हल्ल्याशी संबंधित नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अशी कारवाई सुरू राहील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com