MSRTC : एसटी महामंडळाचा निर्णय ; राज्यात 5 प्रादेशिक विभागांची स्थापना
राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनात आता ऐतिहासिक बदल होत आहे. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात पहिल्यांदाच 5 प्रादेशिक विभाग स्थापन केले जाणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या व्यवस्थेनुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या ठिकाणी स्वतंत्र प्रादेशिक कार्यालये सुरू केली जातील. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. लवकरच प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे कार्यरत होणार आहे.
काय बदल होणार?
आतापर्यंत एसटी महामंडळात आगार (तालुका), विभागीय कार्यालय (जिल्हा) आणि मध्यवर्ती कार्यालय (राज्यस्तर) अशी त्रिस्तरीय रचना होती. मात्र महसूल विभागाच्या धर्तीवर प्रादेशिक विभागांचा समावेश नव्हता, त्यामुळे निर्णय प्रक्रिया धीम्या गतीने होत होती. आता नवीन पाच विभागांमुळे स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया जलद होईल, आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा मिळेल.
कर्नाटक दौऱ्यानंतर घेतलेला निर्णय
प्रताप सरनाईक यांनी कर्नाटक दौऱ्यादरम्यान तेथील परिवहन व्यवस्थेचे विकेंद्रीकरण पाहून ही संकल्पना मांडली. महाराष्ट्रातील एसटी महामंडळ हे कार्यक्षेत्राने मोठे असूनही निर्णयासाठी सर्व काही मुंबईवर अवलंबून होते. त्यामुळे स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा लागला, तरी वेळ लागत असे.
स्वतंत्र कार्यालये आणि अधिकारी नेमणुकीची प्रक्रिया सुरु
प्रत्येक प्रादेशिक विभागासाठी स्वतंत्र मुख्यालय निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणी आवश्यक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच कार्यालये कार्यान्वित होतील आणि सेवा दर्जा उंचावण्यासाठी नियोजन केले जाईल. हा निर्णय प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल आणि एसटी महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.