Kunal Kamra Controversy : "मुंबईत गेलो तर जीवाला धोका...", कुणाल कामराची मद्रास उच्च न्यायालयात धाव
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कविता सादर केली. यावरून मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले आहेत. या कवितेतून कुणाल कामराने शिंदे यांना गद्दार असे म्हटले असल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले. कुणालचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुणाल कामराचे जिथे शूट झाले त्या स्टुडिओची शिंदेंच्या कार्यकर्त्यांची तोडफोडदेखील करण्यात आली.
दरम्यान या तोडफोडप्रकरणी शिंदेंच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र आता कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे आता कुणालने थेट मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली असून अर्ज केला आहे. यामध्ये मुंबईमध्ये गेल्यास जीवाला धोका असल्याचे कुणालने म्हंटले आहे.
कुणालने अर्जात म्हंटले आहे की, "मी विल्लुपुरम तामिळनाडूचा राहणारा आहे. मी जर मुंबईत गेलो तर मला मुंबई पोलिसांकडून अटक केली जाईल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे". त्यामुळे आता कुणालच्या अर्जावर न्यायालयाकडून काय सुनावणी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.