Sanjay Raut : ...तिकडे कबूतरखाना सुरु करा ; संजय राऊतांचा खोचक सल्ला
थोडक्यता
सध्या कबूतरखान्याचा वाद पेटण्याची शक्यता
संजय राऊत काय म्हणाले?
जैनमूनी कैवल्य रत्न महाराजांचे वादग्रस्त विधान
आगामी महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या कबूतरखान्याचा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच काल दादरमध्ये जैन समुदायाकडून मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. दादरच्या योगी सभागृहात ही प्रार्थनासभा पार पडली. मुंबईतील कबूतरखाने पुन्हा सुरू व्हावेत, अशी मागणी या प्रार्थनासभेतून करण्यात आली. तसेच अनेक कबुतरे रस्त्यावर येत असून, अपघातांमध्ये त्यांचा मृत्यू होत असल्याचा दावा समुदायाकडून केला जात आहे. या प्रार्थनासभेच्या माध्यमातून कबुतरांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना कबुतरखान्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. कबुतरखान्यासंदर्भात भारतीय संविधानात असं कधी म्हटलं आहे का की कबुतरखाने हटवू नये. यामुळे कबुतरखान्यामुळे लोकांच्या आरोग्याला त्रास होतो, लोकांना अडचणी येतात आणि प्रकृती बिघडते, ज्यामुळे लोकांमध्ये आजार निर्माण होतात. त्यापेक्षा मरीन लाईन्सला लोढांचा एक जनकल्ब निर्माण झाला आहे. ग्रँड मेडिकल जिमखाना हा जैन समाजाने घेतला आहे. त्या मैदानात कबुतरखाना करावा, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला.
आम्ही कबुतरांना दाणे देऊ. आम्हीही मानवतावादी, भूतदयावादी आणि दयावादी आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा भूतदयावादी नेता नव्हता. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात भेद करु नका. उद्धव ठाकरे त्याच पक्षाचे प्रमुख आहेत, जो बाळासाहेबांनी स्थापन केला. आनंद दिघे हे ठाण्यातील जिल्हाप्रमुख होते, असेही संजय राऊतांनी म्हटले.
जैनमूनी कैवल्य रत्न महाराजांचे वादग्रस्त विधान
दरम्यान नुकत्याच आयोजित केलेल्या धर्मसभामध्ये जैनमूनी कैवल्य रत्न महाराज बरळल्याचे दिसून आले. कबूतर शांतता प्रिय प्राणी आहे. आमचा धर्म सांगतो, मरायचं दुसऱ्यासाठी असेल तरी चालेल. रावणासमोर जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रीराम यांनी एवढं केलं. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको आहे. मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं?, दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही, असे कैवल्य रत्न महाराज म्हणाले होते.