राज्य सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, बाप्पाचे आगमन होणार आनंदात
राज्यात नुकताच मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव पार पडला. सध्या सर्वत्र बाप्पाच्या आगमनाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदीची बातमी समोर आली आहे. त्यांना बाप्पा पावलाय असेच म्हणता येईल. राज्य सरकारने एक मोठा निर्णय सरकार कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. बाप्पाचा आगमनाआधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसे येणार आहेत. सणसमारंभासाठी सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांचा 29 ऑगस्टलाच पगार होणार आहे. उत्सव साजरा करताना अडचण येऊ नये यासाठी पगार लवकर होणार आहे. शासनाने यासंदर्भात काल परिपत्रक काढले आहे.
दरम्यान, याआधी 16 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता (DA) 3 टक्क्यांने वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यात म्हटले आहे की, नवीन डीए ऑगस्टमध्येच लागू होईल. CMO च्या निवेदनानुसार, महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 34 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
यंदा सर्व सण,उत्सव विनानिर्बंध
दोन वर्षानंतर देशासह राज्यात कोरोनाचा उद्रेक कमी झाली. याचा दिलासा आता नागरिकांना मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारने सणावरचे निर्बंध हटवले आहे. राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे यंदाचा गणेशोत्सव, दहीहंडी त्याचबरोबर मोहरम सण देखील धुमधडाक्यात साजरा होणार आहे. कोरोना काळात तत्कालीन राज्य सरकारने गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवावर लावलेले सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा देखील हटवली आहे.