MSEB strike 2025 : खाजगीकरणाच्या विरोधात वीजकंपन्यांचा उद्या राज्यव्यापी संप
विद्युत क्षेत्रात खाजगीकरणाचा शिरकाव झाल्यामुळे विद्युत क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम दिसून आला आहे . याच खाजगीकरणाच्या विरोधात तसेच अदानी-टोरंट पॉवरला 24 विभागांचे वीज वितरण देण्याच्या जो निर्णय घेण्यात आला त्यामुळे कामगार संघटना आक्रमक झाली असून आता त्यांनी राज्यव्यापी संपाचे शस्त्र उगारले आहे. उद्या ९ जुलैला हा संप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
समांतर वीज परवाना धोरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, (आयटक), सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉग्रेस (इंटक), तांत्रीक कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन या वीज कामगार संघटनांचा समावेश आहे. सर्व संघटनांनी स्थापन केलेल्या कृती समितीने महाराष्ट्र शासन, ऊर्जामंत्री व तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला २३ जून रोजी या संपाबाबत रितसर नोटीस दिलेली आहे
स्मार्ट मिटर योजनेविरुद्ध तसेच जलविद्युत निर्मिती केंद्राचे खाजगीकरण, ४२ हजार कंत्राटी-बाह्य स्त्रोत कामगारांना कायम करण्यात यावे, महावितरण कंपनीचे ३२९ सबस्टेशन्स खासगी ठेकेदारांना चालविण्यास काढलेल्या निविदा रद्द करण्यात याव्या, तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंत्यांना शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार पेन्शन योजना लागु करा या प्रश्नांकरीता राज्यव्यापी संप करण्याचा संयुक्त निर्णय घेतला आहे.
मात्र असे असले तरी २४ तासांच्या या संपासाठी महावितरणकडून पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली आहे. वीजग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.