नागपूरमध्ये 2 गटांमध्ये दगडफेक; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नागपूरमध्ये दोन गट समोरासमोर आल्याने नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून 2 गटात दगडफेक झाली. यामध्ये काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल असून पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आले आहे. सध्या तणावपूर्ण स्थिती आहे.
याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नागपूर शहरात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात मोठे नुकसान झाले. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. नागरीकांना आवाहन आहे की कृपया कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, परस्पर सामंजस्य आणि सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुयात. हा महाराष्ट्र प्रागतिक विचारांचा आहे. आपल्या राज्याची ही ओळख कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.