Atul Save : मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
थोडक्यात
औरंगाबादमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
शनिवारी (दि. 12) दुपारी साधारण 12 वाजता पुंडलिकनगर भागात ही घटना घडली.
सावे हे त्या वेळी आपल्या कार्यालयात बैठकीसाठी आले होते. त्यांच्या गाडी कार्यालयासमोर उभी असताना अचानक एका तरुणाने मोठा दगड फेकला.
Stones pelted at Minister Atul Save's car : औरंगाबादमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (दि. 12) दुपारी साधारण 12 वाजता पुंडलिकनगर भागात ही घटना घडली. सावे हे त्या वेळी आपल्या कार्यालयात बैठकीसाठी आले होते. त्यांच्या गाडी कार्यालयासमोर उभी असताना अचानक एका तरुणाने मोठा दगड फेकला. दगड गाडीच्या समोरील भागावर आदळल्याने वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. घटनेनंतर लगेचच सुरक्षा रक्षक आणि स्थानिकांनी त्या व्यक्तीला पकडले.
या प्रकरणी अतुल सावे यांच्या ड्रायव्हरने तक्रार दाखल केली असून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. प्राथमिक चौकशीत तो तरुण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
घटनेच्या वेळी मंत्री अतुल सावे कार्यालयातच उपस्थित होते. ते बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच ही दगडफेक झाली. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र, या प्रसंगामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने जमा झाल्याने गोंधळाची परिस्थितीही निर्माण झाली होती.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मंत्री सावे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली तरी ही घटना गांभीर्याने घेतली जात असल्याचे सूत्रांकडून कळते. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.