जन्मतः कर्णबधिर बालरुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

जन्मतः कर्णबधिर बालरुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

दोन्ही कानांनी जन्मतः कर्णबधिर असलेल्या बालरुग्णांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याची किमया पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली.
Published by :
Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे, वर्धा

दोन्ही कानांनी जन्मतः कर्णबधिर असलेल्या बालरुग्णांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याची किमया पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. रुग्णालयातील कान, नाक व घसारोग विभागाद्वारे कॉक्लियर इम्प्लांटेशन कार्यक्रमांतर्गत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. 

जन्मापासूनच कर्णबधिर असलेल्या दोन व चार वर्षीय बालकांना मार्च महिन्यात सावंगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कानाने ऐकू येत नसल्याने बोलण्याची क्षमताही या बालकांमध्ये विकसित झाली नव्हती. मात्र विविध तपासण्या केल्यानंतर कॉक्लियर इम्प्लांटद्वारे या बालरुग्णांवर उपचार करणे शक्य असल्याचे लक्षात आल्याने मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध कॉक्लियर इम्प्लांट सर्जन डॉ. मिलिंद कीर्तने यांना बोलविण्यात आले. डॉ. कीर्तने यांनी आजतागायत २,३०० हून अधिक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्या असून इम्प्लांटेशनचे प्रशिक्षक म्हणूनही ते ख्यातनाम आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाकरिता त्यांना भारत सरकारद्वारे पद्मश्री सन्मानही प्राप्त झाला आहे. या शस्त्रक्रिया प्रक्रियेत डॉ. कीर्तने यांच्यासह सावंगी रुग्णालयातील कान, नाक व घसारोग विभाग प्रमुख डॉ. प्रसाद देशमुख, प्रा. डॉ. श्रद्धा जैन, डॉ. सागर गौळकर, डॉ. चंद्रवीर सिंग, डॉ. आशीष दिसवाल, डॉ. अर्जुन पानीकर, डॉ. आदित्य रंजन, डॉ. अजिंक्य संदभोर, डॉ. वैदेही हांडे, डॉ. मिथिला मुरली, डॉ. मनीषा दास, डॉ. ऐश्वर्या विजयप्पन, डॉ. सेनू सन्नीचन, डॉ. जसलीन कौर, डॉ. आयुषी घोष, डॉ. निमिषा पाटील, डॉ. स्मृती वाधवा, स्पीच थेरपिस्ट किरण कांबळे, ऑडिओलॉजिस्ट प्रियता नाईक, महेंद्र रहाटे, संजय कराळे यांचा सहभाग होता. 

स्पीचथेरपीमुळे मुले बोलूही लागतील

कॉक्लियर इम्प्लांटेशन उपचार प्राप्त झाल्यामुळे या बालकांना मौखिक भाषा कळणे सोपे झाले आहे. परिणामतः ही बालके आता केवळ ऐकूच शकणार नाहीत, तर आगामी अडीचतीन वर्षात स्पीच थेरपीमुळे सर्वसामान्य मुलांप्रमाणे नीट बोलूही शकतील, असे डॉ. प्रसाद देशमुख यांनी सांगितले. कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेत तज्ज्ञांची सेवा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजीव बोरले, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, अधिष्ठाता डॉ. अभय गायधने, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com