Sudhakar Badgujar : 'न्यायालयही कधीच एकतर्फी निर्णय घेत नाही'; सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केली खंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी करण्यात आलेली आहे. "पक्षाबाबत नाराजी व्यक्त करणे, हा काही गुन्हा नाही. मात्र, या संदर्भात माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. मी नाशिकच्या बाहेर असल्याने पक्षाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहू शकलो नाही. माझा नियोजित दौरा असल्याचे मी कळवले देखील होते. परंतु, पक्षावर नाराजी व्यक्त करणं किंवा मुख्यमंत्र्यांना भेटल्यावरून जर अशी कारवाई होत असेल तर मला वाटतं हे चुकीच आहे," अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (Shivsena) उपनेते सुधाकर बडगुजर यांनी याआधी दिली होती.
त्यानंतर, आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपले मत मांडले. बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत लवकरच माझ्या लोकांना विचारून पुढील निर्णय घेईल, असे सांगितले. पण, "भाजपच्या (BJP) नेत्यांनी जी पत्रकार परिषद घेऊन उगाच थयथयाट का केला?," असा खोचक सवालही बडगुजर यांनी उपस्थित केला. तसेच, शिवसेनेला ही एक प्रकारे चॅलेंज केलं आहे.
"मी प्रवासात असतानाच मला शिवसेना पक्षातून हकालपट्टी झाल्याची माहिती मिळाली. पक्षामध्ये कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे, हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. मी यावर आता काही बोलणार नाही, मी योग्य वेळी प्रतिक्रिया देईन. पक्षामध्ये संघटनात्मक बदल झाले, तेव्हा त्यावेळी मी माझी नाराजी बोलून दाखवली आणि हा जर माझा गुन्हा असेल तर मी गुन्हा केला आहे. त्याची शिक्षा म्हणून जर माझी हकालपट्टी केली असेल, तर ती मला मान्य आहे," असे सुधाकर बडगुजर म्हणाले.
"आजवर कुठलीही अशी कारवाई झाली नव्हती. गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो होता, तेव्हा तुम्ही असा फोटो का काढला, अशी विचारणा खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावेळी, अरविंद सावंत हे सुद्धा होते. मग केवळ माझ्यावरच कारवाई का ?," असा सवाल मी त्यांना केल्याचे बडगुजर यांनी सांगितले. "मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नागरिकांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री यांना भेटलो होतो. मी शिवसेनेविरोधी एकही कृत्य केलेले नाही. मी शिवसेना संघटनेविरोधी एक जरी काम केले असेल आणि ते जर दाखवून दिले तर राजकारण सोडून देईन," अशा शब्दात सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना नेतृत्वालाच चॅलेंज दिले आहे.
संजय राऊत यांच्याशी मोबाईलवर झालेले मेसेज बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. "न्यायालयात ही दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून निर्णय घेतला जातो. एकतर्फी निर्णय होत नसतो," अशी खंत यावेळी सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केली. दरम्यान, या संदर्भात जो काही निर्णय सुधाकर बडगुजर यांनी घेतला, तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. ही चुकीची कारवाई केल्याचं मत बडगुजर यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.