Sunil Tatkare : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातूनच उतरू; सुनील तटकरे यांची स्पष्ट भूमिका

Sunil Tatkare : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातूनच उतरू; सुनील तटकरे यांची स्पष्ट भूमिका

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना आम्ही महायुतीच्या घटक पक्षांसह एकत्रितपणे उतरणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना आम्ही महायुतीच्या घटक पक्षांसह एकत्रितपणे उतरणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवर पक्षाचे बळ वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शनिवारी (दि. 19) परभणीतील अक्षदा मंगल कार्यालयात ‘निर्धार नव पर्वाचा’ या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तटकरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश विटेकर, शहराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

तटकरे म्हणाले, “गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे चांगले यश मिळाले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा काळ जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी, संघटन विस्तार आणि तयारीच्या दृष्टीने कार्यकर्ता संवादाचे आयोजन केले आहे.”

ईव्हीएम संदर्भात विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर उत्तर देताना त्यांनी म्हटले, “ईव्हीएमवरून पराभवाचे कारण देणे हा केवळ भावनिक मुद्दा असून त्यात तथ्य नाही.”

राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत अपप्रचार करणाऱ्यांना उत्तर देताना तटकरे म्हणाले, “ही योजना सुरूच राहणार असून त्यात आवश्यक असल्यास लाभार्थ्यांना अधिक मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

कार्यकर्त्यांनी समाजातील विविध घटकांशी अधिक सघन संपर्क साधावा, विशेषतः युवक आणि महिलांना राजकारणात संधी देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. “स्थानिक नेतृत्वाने प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य स्थान देऊन पक्ष बळकट करण्यावर भर द्यावा, तरच जिल्ह्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उभा राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

Sunil Tatkare : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातूनच उतरू; सुनील तटकरे यांची स्पष्ट भूमिका
Pune News : पुण्यात तब्ब्ल 5000 किलो चिकनचे वाटप; श्रावण सुरु होण्यापूर्वी आज शेवटचा रविवार
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com