Sunita Williams : सुनीता सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं अखेर पृथ्वीवर लँडिंग झालं. 9 महिन्यांनी अवकाशातून पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्स यांची पहिली झलक समोर आली आहे. सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरवर पोहोचले होते. 8 दिवसांचाच त्यांचा हा प्रवास होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना 9 महिने थांबावे लागले. सुनीता विल्यम्स यांची पहिली झलक व्हिडीओच्या माध्यमातून नासाकडून शेअर करण्यात आली असून पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर परतल्या.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, #Crew9, तुमचं स्वागत आहे! पृथ्वीने तुमची आठवण काढली. त्यांच्यासाठी धैर्य, धाडस आणि अमर्याद मानवी आत्म्याची ही परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि #Crew9 अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले आहे की चिकाटीचा खरा अर्थ काय असतो. विशाल अवकाशासमोर त्यांचा अढळ दृढनिश्चय लाखो लोकांना कायम प्रेरणा देईल.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, अवकाश संशोधन म्हणजे मानवी क्षमतेच्या मर्यादा ओलांडणे, स्वप्न पाहण्याचे धाडस करणे आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे धाडस करणे. एक अग्रणी आणि आयकॉन असलेल्या सुनीता विल्यम्स यांनी या कारकिर्दीत याचे उदाहरण दिले आहे. त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा अचूकता उत्कटतेला आणि तंत्रज्ञान दृढतेला भेटते तेव्हा काय होते हे त्यांनी दाखवून दिले आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.