Sunny Deol : धर्मेंद्र यांच्या प्रकृतीच्या चिंतेदरम्यान घराबाहेर पापाराझींवर सनी देओल संतापला म्हणाला की, “लाज वाटत नाही का?”
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तब्बल बारा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या ते मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. डॉक्टर आणि देओल परिवार त्यांच्यावर घरच्या घरी उपचार करत आहेत. धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी हेमा मालिनी, ईशा देओल, तसेच अनेक कलाकार आणि मित्र मंडळी त्यांच्या घरी जात आहेत. मात्र, त्यांच्या तब्येतीबाबत जाणून घेण्यासाठी घराबाहेर चाहत्यांची आणि माध्यम प्रतिनिधींची गर्दी वाढली आहे.
अशा परिस्थितीत गुरुवारी सकाळी सनी देओल वडिलांना भेटण्यासाठी धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी उपस्थित पॅपाराझी सतत फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याने सनी देओल प्रचंड चिडला. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात तो माध्यम प्रतिनिधींना फटकारताना दिसतो. व्हिडिओमध्ये सनी म्हणतो, “थोडी लाज बाळगा. घरात तुमच्याही आई-वडिलांना त्रास झाला तर तुम्हाला कसं वाटेल?” त्याच्या चेहऱ्यावरची चिंता आणि भावनिक स्थिती स्पष्ट दिसून येते.
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी म्हणाल्या,“हा काळ आमच्यासाठी कठीण आहे. देवावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करत आहोत. धरमजी आता घरी आहेत, हीच मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे.” सध्या सनी देओलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून, चाहत्यांनी धर्मेंद्र यांच्या **लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

