Vijay Thalapathy : सुपरस्टार थलापती विजयची अभिनयातून निवृत्ती; ‘जन नायकन’ ठरणार शेवटचा चित्रपट
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली असून, चाहत्यांसाठी ही मोठी आणि भावनिक बातमी ठरली आहे. तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासानंतर विजय यांनी चित्रपटसृष्टीला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा त्यांनी २७ डिसेंबर २०२५ रोजी मलेशियामध्ये दिग्दर्शक एच. विनोद यांच्या ‘जन नायकन’ या आगामी चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात केली.
विजय यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केवळ १० वर्षांच्या वयात तमिळ चित्रपट ‘वेट्री’मधून बालकलाकार म्हणून केली होती. पुढे १८ व्या वर्षी ‘नालैया थीरपू’ (१९९२) या चित्रपटातून त्यांनी नायक म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ‘घिल्ली’, ‘थुप्पाक्की’, ‘मर्सल’, ‘सरकार’, ‘मास्टर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून विजय यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
सध्या ५१ वर्षांचे असलेले विजय यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की ‘जन नायकन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट असेल. मंचावरून बोलताना त्यांनी सांगितलं, “लोक माझ्यासाठी थिएटरमध्ये येतात, रांगेत उभे राहतात. मला पुढील ३०–३३ वर्षे याच लोकांसाठी उभं राहायचं आहे. म्हणूनच मी अभिनयातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.” यापुढे ते पूर्ण वेळ राजकारणावर लक्ष केंद्रित करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
गेल्या वर्षी विजय यांनी ‘तमिळगा वेट्री कझगम’ हा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. हा पक्ष २०२६ मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सक्रियपणे सहभागी होणार आहे. अभिनयातून राजकारणात पूर्णवेळ उतरण्याचा हा निर्णय त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी घेतल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.
करिअरच्या सुरुवातीपासूनच टीका, वाद आणि अपेक्षांचं दडपण विजय यांना पेलावं लागलं. मात्र, चाहत्यांचं प्रेम आणि पाठिंबा कायम त्यांच्या पाठीशी राहिला. “३३ वर्षांपासून मिळालेलं प्रेम मी कधीही विसरणार नाही,” असं भावनिक विधान त्यांनी केलं. २०१५ मधील ‘पुली’नंतर विजय यांचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला नाही. ‘बीस्ट’ (२०२२), ‘वारिसु’ (२०२३) आणि ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (GOAT, २०२४) या चित्रपटांना संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या, तरी कमाईच्या बाबतीत त्यांनी मोठी यशस्वी कामगिरी केली. अभिनयातून घेतलेली ही निवृत्ती जरी चाहत्यांसाठी धक्का देणारी असली, तरी राजकारणात विजय कोणती नवी भूमिका बजावतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
