Supreme Court : मुंबईत आलिशान फ्लॅट, BMW आणि 12 कोटींची पोटगी; अवघ्या 18 महिन्यांच्या लग्नावर महिलेची पतीकडून मागणी, सरन्यायाधीश म्हणाले...
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात अनोखी मागणी समोर आली. पतीसोबत अवघ्या 18 महिन्यांचे सहजीवन झालेल्या एका महिलेने, घटस्फोट प्रक्रियेदरम्यान मोठी आर्थिक पोटगी, मुंबईत आलिशान घर आणि महागडी BMW कारची मागणी न्यायालयाकडे केली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी महिलेच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करत तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सल्ला दिला. "तुम्ही इतक्या सुशिक्षित आहात, MBA केलं आहे, IT क्षेत्रात काम केले आहे. बंगळुरू, हैदराबादसारख्या शहरांत तुमच्यासाठी संधी आहेत. मग पैशांची मागणी का करताय?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महिलेने न्यायालयात स्वतःची बाजू मांडताना सांगितले की, तिच्या पतीनेच विवाह रद्द करण्याचा अर्ज केला असून तिला मानसिक आजार असल्याचा आरोप लावला आहे. "मी स्किझोफ्रेनिक वाटते का?", असा प्रश्न तिने सरळ न्यायाधीशांना विचारला. तसेच, पतीने नोकरी सोडायला लावल्याचा आरोपही तिने केला.
महिलेच्या पतीकडून बाजू मांडणाऱ्या वकिलांनी नमूद केले की, पतीचं उत्पन्न पूर्वीपेक्षा कमी झालं असून तिच्या मागण्या अवाजवी आहेत. "संपूर्ण जबाबदारी एकट्या पतीवर टाकता येणार नाही, महिलेला स्वतःही काहीतरी करायला हवे," असे मत वकिलांनी मांडले.
सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की, पतीच्या वडिलांच्या मालमत्तेवर तिचा काहीही हक्क नाही. त्याचबरोबर त्यांनी सूचवले की, तिने 4 कोटी रुपये स्वीकारावेत आणि पुणे, बंगळुरू, हैदराबादसारख्या आयटी केंद्रांमध्ये नोकरीची संधी शोधावी.
"तुम्ही शिकलेल्या आहात, मागून खाण्यापेक्षा, स्वतः कमवून खायचं शिका," असा सल्ला देत सरन्यायाधीशांनी निर्णय राखून ठेवला आहे.