Supriya Sule : गृहमंत्री महोदयांचे पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडे लक्ष नाही, त्यामुळे येथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे

Supriya Sule : गृहमंत्री महोदयांचे पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडे लक्ष नाही, त्यामुळे येथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे शहरात देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. याखेरीज आयटी उद्योगामुळे देशभरातील अभियंते येथे काम करीत आहेत. शिवाय विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकही पुण्याला आपली पसंती देतात. पुणे हे शहर कला आणि सांस्कृतिक घडामोडींच्या दृष्टीने देखील जगभरात प्रसिद्ध आहे. ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शांतताप्रिय पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे शहराच्या एकंदर प्रतिमेला तडा जात आहे.

शहरात ड्रग्ज आणि गांजासारखे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे दिसते.येथे कोयता गँग आणि इतर गुन्हेगारीने उच्छाद मांडला असून कल्याणीनगर ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर शहरातील कायदे आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. स्वतः गृहमंत्र्यांना शहरात ठाण मांडून बसावे लागले ही बाबच परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्यास तसेच शासन आणि गृहमंत्र्यांचे कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यातील अपयश अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.

यासोबतच त्या म्हणाल्या की, गृहमंत्री महोदयांचे पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडे लक्ष नाही. त्यामुळे येथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. यासोबतच शहरातील सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. राज्याच्या गृहखात्याने अजूनही वेळ न घालविता शहराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गृहखात्याने येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे आणि नागरीकांना विश्वास द्यावा, हे सद्यस्थितीत अतिशय महत्वाचे आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com