Sharad Pawar
Sharad Pawar

बारामतीतून सुप्रिया सुळे निवडणूक लढणार, मविआच्या महासभेत शरद पवारांची घोषणा, म्हणाले, "तुतारी फुंका आणि..."

बारामतीत महाविकास आघाडीच्या महासभेत शरद पवारांनी महायुती सरकावर जोरदार टीका केली.
Published by :
Team Lokshahi

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) रणशिंग फुंकलं असून बारामतीच्या महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवार यांनी मोठी घोषणा केलीय. बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे निवडणूक लढणार असल्याची घोषणा पवारांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली. यावेळी पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार जनतेशी संवाद साधत म्हणाले, तुम्ही सर्वांनी सुप्रिया सुळे यांना तीनवेळा निवडून दिलं आहे. पार्लमेंटमध्ये ज्या दोन-तीन खासदारांचा लौकीक आहे, त्यात तुमच्या उमेदवाराचा (सुप्रिया सुळे) लौकीक आहे. संसदेत ९८ टक्के उपस्थिती ज्यांच्याकडे आहे, त्यात सुप्रिया सुळे यांचं नाव आहे. संसदेतला उत्तम खासदार पुरस्कार एकदा नाही तर सातवेळा मिळाला आहे. या भागातील दुखणं दूर करण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर टाकली आहे, असं सांगत पवारांनी कार्यकर्त्यांना तुतारी फुंकण्याचं आवाहन केलं.

पवार पुढे म्हणाले, ही निवडणूक सर्वांसाठी महत्वाची आहे. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांनी देशाचं नेतृत्व केलं. या कालावधीत देशाच्या भवित्याची चिंता नागरिकांच्या मनात नव्हती. पण आता शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न वाढला आहे. दहा वर्ष माझ्याकडे शेतीचं काम होतं, शेती या देशाच्या लोकांचा व्यवसाय आहे. आज या देशात धान्य कमी होत आहे. परदेशातील धान्य आणणं बंद केलं पाहिजे, हे आम्ही ठरवलं होतं आणि या देशाचं चित्र बदलंल.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यानी आत्महत्या केली, याबाबत मला माहिती मिळाली. त्यावेळी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना याबाबत सांगितलं, की या आत्महत्येच्या मागचं कारण शोधलं पाहिजे. त्यांच्या घरी जाऊन त्या माऊलीला विचारलं की, काय झालं, तिने सांगितलं मुलीचं लग्न ठरलंय, सावकराकडून कर्ज काढलं होतं. ते फेडता आलं नाही. त्यामुळे मुलीचं लग्न मोडलं आणि त्यांनी आत्महत्या केली. यामागंच कारण एकच आहे कर्जबाजारीपणा.

आमच्या काळात ७१ हजार कोटींचं कर्ज आम्ही माफ केलं, आजही आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. कुणीही देशात पंतप्रधान झाला तर त्याने संपूर्ण देशाचा विचार केला पाहिजे. पंतप्रधान देशासह राज्याचा नेता असतो. राज्याचा विचार करणारा कुणीही असो तो देशाचा विकास करु शकत नाही, यासाठी या निवडणुकीत त्यांचा पराभव करायचं आहे.

परदेशातून काळा पैसा आणून शेतकऱ्यांच्या खिशात टाकतील असं वाटलं होतं. पण काहीही झालं नाही. पंजाब, हरयाणा येथील शेतकरी दोन वर्षापासून आंदोलन करीत आहेत. पण त्यांच्याकडे मोदी सरकारने ढुंकूनही बघितलं नाही. सत्ता लोकांसाठी वापरायची असते. पण ही सत्ता लोकांना त्रास देण्यासाठी वापरली जाते. अनिल देशमुखांनी एका कॉलेजसाठी देणगी घेतली आण त्यांच्यावर खटला घातला आणि त्यांना वर्षभरासाठी तुरुंगात टाकलं, असं म्हणत पवारांनी महायुती सरकारवर तोफ डागली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com