Suresh Dhas : मस्साजोगनंतर परळी, देशमुखांनंतर सुरेश धस मुंडे कुटुंबीयांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा?
संतोष देशमुख हत्या प्रकरणा दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर धस चर्चेत येताना दिसले मुंडेंच्या भेटीनंतर धस आपली भूमिका बदलतात का? असे अनेक प्रश्न धसांसमोर उपस्थित केले जात होते. तसेच त्यांच्यावर विरोधीपक्षाकडून मोठ्याप्रमाणात टीका टिप्पणी केली जात होती. एवढ सगळ झाल्यानंतर आता पहिल्यांदा त्यांनी देशमुख कुंटुंबीयांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. तसेच मस्साजोग मध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या भेटीला गेले.
सुरेश धस म्हणाले की, "महादेव मुंडे यांचा खून झाला त्यावेळेस त्यांची गाडी घेऊन जाण्यात आली ज्यात सर्व साहित्य होते. पोलीस आहेत की, पोलिसांच्या वर्दीतील दरिंदे आहेत हेच कळत नाही. पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे पंधरा वर्षांपासून येथे आहे. या हप्त्यात पोलिसांचा हात आहे का? आकाशी संबंधित लोकांनी प्लॉट घेतला. नवीन पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा आहे ते यातील आरोपीला अटक करतील. मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला यांच्याकडे मी या प्रकरणाची लेखी तक्रार करणार. परळी मध्ये कीड्या मुंग्यासारखे माणसं मारली जात आहेत. परळी बदनाम का होते याकडे लक्ष द्या. महादेव मुंडे हा एकटा आहे का प्लॉटिंगचा व्यवसाय करणारा?" सुरेश धस यांनी असा प्रश्न केला आहे.
धसांचा निशाणा पोलिस प्रशासनावर
"महादेव मुंडेचा खूनी पोलिसांना का सापडत नाही? परळीत 35 लाखात मर्डर प्रकरण मिटते. राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक का मिळत नाही? हे सर्व याचा परिपाक आहे. या प्रकरणात आकाचा संबंध आहे किंवा पोलिसांनीच आमचा माणूस मारला आहे. या प्रकरणात पोलिसांची मिली भगत आहे त्याशिवाय एवढा मोठा खून होणार नाही. त्यानंतर त्याच ठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला. राजस्थानी मल्टीस्टेट बँकेमुळे सहा लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. महादेव मुंडे व्यवसायिक असताना देखील त्याचा यात काय संबंध? परळीचे पोलीस दल इथून उचलून दुसरीकडे नेले पाहिजे आणि दुसरे लोक या ठिकाणी आणले पाहिजेत अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असं सुरेश धस म्हणाले आहेत".
पोलीस अधिकाऱ्यांवर संशयाची सुई
"आकाच्या आवडत्या लोकांनी महादेवचे जीवन संपवले. मी ज्ञानेश्वरी मुंडे यांना विनंती करतो त्यांनी आपले उपोषण चार ते पाच दिवसांनी पुढे ढकलावे. या प्रकरणात काहीतरी प्रगती होईल मी स्वतः यात लक्ष घालत आहे. त्या उपोषणावर ठाम राहिल्या तरी मी त्यांच्याबरोबर राहील. मात्र विनंती त्यांनी आठ दिवसांची मुदत द्यावी. हे पोलीस नेमके कुणाला लागत होते याची देखील चौकशी झाली पाहिजे. जे जुने पोलीस दल जे तीन वर्षांपेक्षा अधिक असतील ते सर्व पोलीस दल परळीतून हलवले पाहिजे. त्यांना परळी मतदारसंघ सोडून बाहेर न्यावे. अन्यथा हे सर्व पोलीस दल बीड जिल्ह्याच्या बाहेर न्यावे अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. मुख्यमंत्र्यांची मी सोमवार किंवा मंगळवारी भेट घेणार आहे. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांची नागपूरला उद्या भेट घेणार. असं देखील सुरेश धस म्हणाले आहेत".