Walmik Karad जर माणसं मारायला लागला तर त्याचं समर्थन कसं करायचं? सुरेश धस यांचा सवाल
एकीकडे महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे बीड, परळीमध्ये या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ आंदोलन, मोर्चे काढण्यात येत आहेत. यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी कराड जर माणसं मारायला लागलं तर त्याचे समर्थन करायचं का असा सवाल उपस्थित करत कराडच्या समर्थकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.
वाल्मिक कराड जर माणसं मारायला लागला तर समर्थन करायचं का?
वाल्मिक कराड बरोबर चांगले संबंध होते पण वाल्मिक कराड या पद्धतीने माणसं मारायला लागले तर त्याचे समर्थन करायचे का? असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लागताच त्याचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी परळी बंदची हाक दिली. एवढा मोठा उद्योग पराक्रम केलेला माणूस जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ बीड, परळी बंद करा म्हणणे कितपत योग्य आहे? जेलमध्ये जाणाऱ्यांसाठी बंद करणं हा नवीन पायंडा ते पाडतायत का? आकाचे लोकं आले तर मुंबईही बंद करु शकतात अशी टीका सुरेश धस यांनी केली आहे.
वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बंद
वाल्मीक कराड याच्या समर्थनार्थ परळी तालुक्यातील धर्मापुरी आणि शिरसाळा गाव सकाळपासून बंद ठेवण्यात आले असून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आहे. देशमुख हत्याप्रकरणाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जातिवाद करीत असून धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांना टार्गेट करत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
बीड परळी महामार्गावर ठिय्या
भाजपा आमदार सुरेश धस संदीप क्षीरसागर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात परळी तालुक्यातील पांगरी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मागील तासाभरापासून बीड परळी महामार्गावर ठिय्या मांडून पांगरी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. तर तरुणांनी थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे. वाल्मीक कराड याच्यावर झालेले गुन्हे खोटे असून या प्रकरणात कराडला न्याय मिळावा. अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आहे. महामार्गावर तासभरापासून ठिया देत हे आंदोलन सुरू आहे.
नेमंक काय म्हणाले सुरेश धस?
वाल्मिक कराडसोबत माझे चांगले संबंध होते. पण वाल्मिक कराड यापद्धतीने माणसं मारायला लागला तर कसं समर्थन करायचं. दोस्त आहे किंवा मैत्री आहे तरी जर असा वागू लागल्यावर त्याच्यासोबत कसं राहायचं असा सवाल विचारत सुरेश धस यांनी अप्रत्यक्षपणे कराड याचे समर्थन करणाऱ्यांना टोला लगावला आहे.