Maharashtra CM : 'आग शांत करा, नाहीतर...' सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून महायुती सत्तेत विराजमान होणार आहे. शपथविधीचा सोहळा 5 डिसेंबरला पार पडणार आहे. मात्र गेल्या मागील दहा दिवसांपासून सत्तास्थापनेचा पेचप्रसंग सुटलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच 'एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद तरी द्यायला पाहिजे,' असे म्हणत गुलाबराव पाटलांनी एकप्रकारे शिंदेंच्या नाराजीची पुष्टी दिली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी बोचरी टीका करत सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सुरु असल्याचे आणि एकनाथ शिंदे सगळे फंडे वापरत असल्याची टीका केली आहे.
सुषमा अंधारेंनी यांनी एक्सवरील पोस्ट
महायुतीतील पक्षांमध्ये सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे साम, दाम, दंड, भेद, भावनिक हे सगळे फंडे वापरत आहेत. संजय राऊत बोलल्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले की राऊत आगीत तेल टाकत आहेत म्हणजे गुलाबराव पाटलांनी मान्य केलं की आग लागली आहे. गुलाबराव पाटील आता रान पेटलंच आहे तर पाच डिसेंबरच्या आधी ते विझवण्याचं काम करा, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.
"लागलेली आग शांत करा नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत आणि गुवाहटी फिरायला गेला होता तेच लोक तुमच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकतील." असा इशाराच सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिला आहे.