स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज राज्यभर आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष नसल्याचे शेट्टींनी म्हटलं आहे.
थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी करण्याचं सत्र राज्य सरकारनं चालवलं आहे. हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही. बुलढाण्यात शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे.
सकाळी 11 वाजता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाटा इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. तसेच बुलढाण्यातही सकाळी 11 वाजता मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट-बकाल इथं रास्ता रोको आंदोलन होणार आहे.