वर्ध्यात 96 व्या मराठी साहित्य संमेलनानिमित्त माजी नगरसेवकांच्या सभेत स्वच्छ नगरीचा नारा

वर्ध्यात 96 व्या मराठी साहित्य संमेलनानिमित्त माजी नगरसेवकांच्या सभेत स्वच्छ नगरीचा नारा

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाला स्थानिक पातळीवर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे ,वर्धा

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाला स्थानिक पातळीवर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून शहर सुशोभीकरण समितीद्वारे आयोजित पूर्वनियोजन सभेत माजी नगरसेवकांनी स्वच्छ वर्धानगरीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी, वेगवेगळ्या प्रभागात रविवार, दि. २२ रोजी सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. 

सध्या वर्धा नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासकीय स्तरावर कामकाज सुरू आहे. असे असले तरी, माजी नगराध्यक्ष, सभापती आणि नगरसेवकांनी राजकीय मतभेद दूर सारत वर्धानगरीत होणारे अखिल भारतीय संमेलन अतिथी साहित्यिक व साहित्यप्रेमींसाठी सुविधापूर्ण आणि आनंददायी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आयोजन समितीद्वारे माजी नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहर सुशोभीकरण समितीचे समन्वयक मुरलीधर बेलखोडे, परिवहन समितीचे समन्वयक सुनील फरसोले, समन्वय समितीचे समन्वयक संजय इंगळे तिगावकर, ग्रंथदिंडी समितीच्या समन्वयक रंजना दाते यांनी आगामी नियोजनाबाबत संवाद साधला. यावेळी, शहरातील मुख्य मार्गासोबतच सर्व प्रभाग स्वच्छ ठेवण्याबाबत समन्वय व सहकार्य, अपूर्ण कामांची पूर्तता करण्यासाठी श्रमदान, सर्व प्रभागात सौंदर्यीकरण व स्वागत फलक प्रदर्शित करणे, ग्रंथदिंडीच्या मार्गाने सजावट, परिसरातील नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक संमेलनात सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे, आदी बाबींवर उपस्थित माजी नगरसेवकांनी सहमती दर्शवित रविवारी सकाळी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. 

या सभेला माजी नगरसेविका श्रेया देशमुख, रंजना पटेवार, शरद आडे, निलेश खोंडे, प्रदीप ठाकरे, नरेश कोलते, श्रीधर देशमुख, सुरेश पटेवार, बाळू सरवार, विजय उईके, आयोजन समितीतील प्रा. शेख हाशम, रवींद्र कडू, मनोज ठाकरे, प्रशांत नागोसे, पंकज घुसे, प्रकाश वैद्य, उमेश कापकर आदींनी आपली मते मांडली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी संमेलनाच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com