Tejasvi Ghosalkar : तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती; राजकीय चर्चांना उधाण
शिवसेना (ठाकरे गट) च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या संचालकपदावर त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही निवड बँकेच्या संचालक मंडळाच्या काल पार पडलेल्या बैठकीत एकमताने झाली. अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “ही निवड सद्भावनेतून करण्यात आली आहे. रिक्त जागा भरणं आवश्यक होतं, आणि मंडळाने एकमताने तेजस्वी घोसाळकर यांच्या नावावर सहमती दर्शवली.”
अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. त्यानंतर रिक्त झालेल्या संचालक पदासाठी त्यांच्या पत्नीची निवड झाली आहे. मात्र, या घडामोडीनंतर राजकीय चर्चांना देखील उधाण आलं असून, "ठाकरे गटापासून आणखी एक माजी नगरसेवक दूर जाणार का?", असा प्रश्न उपस्थित होतोय.
दरम्यान, भाजप नेते आणि बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देत म्हटले, “मराठी मतदार फक्त त्यांचाच आहे, या भ्रमातून ते बाहेर यावं. भाजपाला मिळालेला जनाधार हा पाकिस्तानी नाही, तो मुंबईतील मराठी जनतेने दिलेला आहे.”
राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, ही नियुक्ती केवळ औपचारिक नाही, तर ठाकरे गटातील संभाव्य फूट व भाजपची आगामी स्थानिक निवडणुकीतील रणनीती याकडेही लक्ष वेधणारी ठरू शकते.