Maharashtra Cold Weather : हिमवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तापमानात घट, थंडीची लाट येणार
थोडक्यात
महाराष्ट्रात आता हवामानाने स्पष्ट कलाटणी घेतली
मुंबईचे तापमान १९ अंश सेल्सिअसवर
हिमवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तापमानात घट
महाराष्ट्रात आता हवामानाने स्पष्ट कलाटणी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी थंडीची चाहूल आता गारठ्यात बदलत आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, १० नोव्हेंबर पासून राज्याच्या बहुतांश भागांत किमान तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आणि शेतकऱ्यांनी पिकांसाठी विशेष काळजी घेण्याची हीच योग्य वेळ आहे.
हिमवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तापमानात घट
संपूर्ण ऑक्टोबर पावसात निघून गेला असतानाच आता नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नागरिकांना सुखद गारव्याचा अनुभव येत आहे. चार दिवसांपूर्वी हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे शीत वारे वाहू लागले आहेत. या शीत वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई सोबत आसपासच्या परिसरातील किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे.
मुंबईचे तापमान १९ अंश सेल्सिअसवर
रविवारी सकाळी मुंबईचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हा संपूर्ण आठवडा याच पद्धतीने किमान तापमानाचा पारा खाली राहील, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. किमान तापमानाचा पारा खाली घसरल्याने मुंबईकरांचा रविवार गारेगार झाला होता. रात्री सोबत दिवसादेखील मुंबईकरांना थंडीचा फील येत असल्याचे चित्र होते.
महाराष्ट्रात थंडीची लाट येणार
मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमान आणखी खाली जाईल. रात्रीचे तापमान दोन ते चार अंशांनी खाली राहण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १५ ते १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मुंबई १९ वर उतरली आहे. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून, शुक्रवारपर्यंत नागरिकांना गारेगार थंडीचा आनंद लुटता येईल. त्यानंतर मात्र तापमानात हलकशी वाढ होईल. मात्र तरिही गारवा कायम राहील. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छ. संभाजी नगर व उत्तर अहिल्या नगर या सहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने तर विदर्भात २ डिग्रीने किमान तापमान खाली येईल. सप्ताहभर म्हणजे शनिवारपर्यंत चांगल्या थंडीची शक्यता आहे
मराठवाड्यात थंडीचा जोर अधिक
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये थंड आणि कोरडे वातावरण राहील. विशेषतः छत्रपती संभाजीनगर येथे किमान तापमान ११°C पर्यंत खाली घसरल्याने थंडीचा जोर सर्वाधिक जाणवेल.
