Victoria Basu Case : एका महिलेमुळे भारत-रशिया संबंधांवर काळे ढग! प्रकरण अधिक गुंतागुंतीचे; सर्वोच्च न्यायालयाची चिंता
एका रशियन नागरिक महिलेमुळे भारत आणि रशिया या दोन देशांतील संबंधांवर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने सर्वोच्च न्यायालयालाही चिंता व्यक्त करावी लागली आहे. ही महिला व्हिक्टोरिया बसू या नावाने ओळखली जाते. त्या मूळच्या रशियन नागरिक असून, 2019 साली भारतात आल्या होत्या. येथे त्यांचे लग्न सायकत बसू या भारतीय नागरिकाशी झाले. काही काळानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाच्या देखभालीचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला.
दरम्यान, न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच व्हिक्टोरिया बसू या अचानक भारत सोडून नेपाळमार्गे रशियात निघून गेल्या. विशेष म्हणजे, त्या आपल्या मुलालाही घेऊन गेल्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवली होती, मात्र त्यांनी आदेशांकडे दुर्लक्ष करून देश सोडल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले.
या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी म्हटले की, “आम्हाला भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर परिणाम होईल असा निर्णय द्यायचा नाही, पण एका लहान मुलाच्या हक्काचा प्रश्न असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”
या घडामोडीनंतर भारतातील रशियन दूतावासाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माध्यमांमधील काही बातम्या वास्तवापासून दूर आहेत. आम्ही भारतीय कायद्याच्या चौकटीत राहून आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत.”
या संपूर्ण प्रकरणामुळे भारत-रशिया मैत्रीवर तात्पुरता तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत, त्याआधीच हे प्रकरण समोर आल्याने राजनैतिक स्तरावरही याकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सध्या या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार असून, न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे.

