Thackeray Bandhu : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची भेट; राजकीय समीकरणे बदलणार?
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत गणेशोत्सवाचे निमंत्रण दिल्याची माहिती मिळाली आहे. हे आमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारल्याने दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
27 ऑगस्ट 2025 रोजी उद्धव ठाकरे सहकुटुंब दादरमधील राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी गणपती दर्शनासाठी जाणार आहेत. या भेटीसाठी खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही भेट केवळ कौटुंबिक नसून, तिचा राजकीय परिणामही होऊ शकतो, असे मानले जात आहे.
गेल्या काही महिन्यांत ठाकरे बंधूंमध्ये वाढलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 5 जुलैला दोन्ही भाऊ एकाच मंचावर दिसले होते, तर 27 जुलैला राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
जवळपास दोन दशकांनंतर ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येताना दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी ही भेट मनसे-ठाकरे गटाच्या संभाव्य युतीकडे इशारा तर करीत नाही ना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.