Chandrashekhar Bawankule : 'ठाकरे बंधूंनी विकासावर बोला' मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं ठाकरे बंधूंना आव्हान

Chandrashekhar Bawankule : 'ठाकरे बंधूंनी विकासावर बोला' मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं ठाकरे बंधूंना आव्हान

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत त्यांना थेट विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचे आव्हान दिले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत त्यांना थेट विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचे आव्हान दिले आहे. मुंबईत संभ्रम निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सातत्याने वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईकर जनतेला भावनिक मुद्द्यांवर दिशाभूल करता येणार नाही, जनता विकासालाच मत देईल आणि आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच विजयी होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बावनकुळे म्हणाले की, निवडणुकीत पराभव दिसू लागला की उद्धव ठाकरे अशा प्रकारची वक्तव्ये करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करतात. मात्र मुंबईकर सजग असून त्यांना कोणत्याही अफवांवर किंवा संभ्रमावर विश्वास नाही. “मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळी करू शकत नाही. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यातही तसाच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भावनिक मुद्दे उभे करून मुंबईकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असला तरी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा ठाम विश्वास असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. विकासकामे, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर महायुतीने ठोस काम केले असून त्याच जोरावर जनता पुन्हा एकदा महायुतीच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अकोट नगरपरिषदेतील भाजप–एमआयएम युतीबाबत बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ही युती चुकीने तयार झाल्याची कबुली देत त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. आमदार प्रकाश भारताकडे यांच्याविरोधात कारवाईचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संयुक्तपणे घेणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणात माध्यमांचा कोणताही दोष नसल्याचे नमूद करत बावनकुळे म्हणाले की, माध्यमांनी केवळ सत्य जनतेसमोर मांडले आहे. भाजप शिस्तबद्ध पक्ष असून चुकीच्या गोष्टींवर कठोर निर्णय घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com