Raj-Uddhav Thackeray : २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र; ‘तो’ निर्णय का घेतला? राज-उद्धव ठाकरेंचं स्पष्ट उत्तर
गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या ऐतिहासिक क्षणाची जनता वाट पाहत होता, तो क्षण अखेर उजाडला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत महापालिका निवडणुकीसाठी युती केली आहे. तब्बल २० वर्षांनी त्यांच्या युतीनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक संयुक्त मुलाखत घेतली. या मुलाखतीत ठाकरे बंधूंनी एकत्र येत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकजूट होण्याचा नारा दिला. “ आम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत,” अशी स्पष्ट भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडली.
मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय
या मुलाखतीच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी हा दिवस उजाडण्यासाठी २० वर्षे का लागली? असा सवाल केला. त्यावर राज ठाकरेंनी सविस्तर उत्तर दिले. का काही गोष्टी घडल्या, हे आता सोडून दिले पाहिजे. महाराष्ट्रावर आणि मुंबईवर सध्या जे संकट आहे, ते मराठी माणसाला समजले आहे. आज हा आमच्या वैयक्तिक अस्तित्वाचा विषय नसून मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. महाराष्ट्र अशा वळणावर उभा आहे जिथे ‘अभी नही तो कभी नही’ अशी परिस्थिती आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली आहे. आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा असला तरी, त्यामागचा मूळ उद्देश मराठी माणसाला एकत्र आणणे हा आहे. आपण आपापसात जर वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडण्याची स्वप्ने पाहणारे आपली पोळी भाजून घेतील. महाराष्ट्र वाचवण्यासाठी पक्षापलीकडे जाऊन मराठी म्हणून एकत्र येणे काळाची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे स्वप्न पाहणारेच आज सत्तेत
यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देताना राज ठाकरेंनी केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. दररोज उत्तरेतून ५६ गाड्या भरून लोक महाराष्ट्रात येत आहेत, ज्यामुळे ठाणे जिल्ह्यासारख्या भागात ८-९ महानगरपालिका बनवाव्या लागल्या आहेत. मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करू अशी भाषा वापरली जात असून हे केवळ रोजीरोटीसाठी नाही, तर स्वत:चे मतदारसंघ बनवण्यासाठी सुरू असलेला खटाटोप आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबई तोडण्याचे जे प्रयत्न झाले होते, तसेच चित्र आजही दिसत आहे. मुंबईवर कब्जा मिळवून ती महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे स्वप्न पाहणारेच आज सत्तेत आहेत, राज ठाकरेंनी असा दावा केला.
जर आज आम्ही एकजुटीने सामना केला नाही, तर महाराष्ट्र आम्हाला कधीच माफ करणार नाही. मुंबई, ठाणे आणि संपूर्ण MMR रिजनचे रक्षण करण्यासाठीच सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे बंधूंनी या मुलाखतीदरम्यान सांगितले.
